विद्यार्थ्यांनी एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास यासोबत देशभक्तीची भावना मनात रुजवावी. तसेच आपल्या सभोवती असलेल्या अपप्रवृत्तींना आळा घालावा, यातूनच आदर्श विद्यार्थी निर्माण होतील. हे विद्यार्थी अद्भुत भारत देश निर्माण करतील असा विश्वास अतिरिक्त महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी येथे व्यक्त केला.

ओमकार एज्युकेशन ट्रस्टतर्फे सुरेंद्र वाजपेयी यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गुंफले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्षा दर्शना सामंत, गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रविण दुधे आदि मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मीनारायण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, वर्गिस कुरिअन, अरुणिमा सिन्हा यांची उदाहरणे दिली. आदर्श कोण असावा तर ज्यांनी समाजासाठी काही तरी केले आहे. अब्दुल कलाम हे शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांसोबत होते, त्यांना प्रेरणा देत होते. भारत हा २०२० मध्ये सर्वाधिक तरुण असलेला देश होणार असून यामध्ये प्रत्येकाने आपले योगदान द्यायला हवे, असे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.

पुस्तकांशी मैत्री करा

मी एकटा काय करु शकतो हा विचार कधीच मनात करु नका. जगाला गर्व वाटेल अशा अद्भूत भारताचे निर्माण विद्यार्थीच करु शकतील. सुजाण नागरिक घडताना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे. सोशल नेटवर्कीगसारख्या अपप्रवृत्तींना दुर ठेवावे. पुस्तकांशी मैत्री करा किमान एक पुस्तक तरी वाचा आणि वृक्षारोपण करा असा संदेश त्यांनी मुलांना दिला.