मुंब्रा, डोंबिवलीच्या खाडीकिनारी रात्रभर बेकायदा रेतीउपसा

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रेती तस्करांनी आपल्या होडय़ांची साग्रसंगीत पूजा करून चोरून रेती उपशाच्या कामाचा आरंभ केला आहे. संध्याकाळी सात वाजल्यानंतर खाडी किनाऱ्यावरून हे रेती तस्कर होडी, बार्ज घेऊन रेतीबंदर मोठागाव, कोपर, मुंब्रा खाडीत जातात. तिथे पहाटे पाच वाजेपर्यंत रेती उपशाचे काम चालत असून ही रेती खाडीकिनाऱ्यावर आणल्यानंतर डम्परमध्ये भरून तात्काळ बाहेरगावी पाठवण्यात येत असल्याची माहिती हाती लागली आहे.

डोंबिवली रेतीबंदर खाडीकिनारी सात ते आठ ड्रेझर उभे असल्याचे दिसून येते. रेती लिलाव कोणी व्यावसायिक घेत नाहीत. मग खाडीकिनारी रेती काढतो कोण, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. रेती तस्करांनी आपल्या होडय़ांना घातलेले नवेकोरे हार त्यांनी केलेल्या कामाची ठळकपणे दाखवून देत आहेत.

कोपर भागात नव्याने रेती उपशाचे दोन तळ तयार करण्याचे काम सुरू असल्याचे समजते. एक बडा राजकारणी रेती तस्करांना या प्रकरणात मदत करीत असल्याचे सांगण्यात येते. महसूल विभागाचे अधिकारी संध्याकाळी घरी निघून गेले की मग रेती तस्कर आपल्या होडय़ा, सक्शन पंप घेऊन खाडीतील प्रवास सुरू करतात. पावसामुळे मोठय़ा प्रमाणात रेती वाहून आलेली असते. त्यामुळे खाडीतून झटपट व स्वच्छ रेती उपलब्ध होत आहे. रात्रीच्या वेळेत उपसा केलेली रेती रात्रीच खाडीकिनारी आणली जाते. ती तात्काळ ड्रेझरने डम्परमध्ये भरून बाहेर गावी पाठविली जाते. बहुतांशी रेती पनवेल, नवी मुंबई परिसरात पाठविण्यात येते, असे जाणकाराने सांगितले.

कल्याण परिसरात रेती तस्करांचे तळ तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केले. कोटय़वधीची सामुग्री नष्ट केली. तरी रेतीमाफिया आपला व्यवसाय सोडण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवली रेतीबंदर खाडीतील रेती दर्जेदार असल्याने तिला बाजारात सर्वाधिक भाव मिळतो. उपशाची रेती रात्री ते पहाटे सहा वाजेपर्यंत डम्परमधून शहराबाहेर गायब केली जाते. रेतीचे ट्रक विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोरून पुढे जातात. मात्र, त्यांची अजिबात तपासणी होत नसल्याचा आरोप होत आहे.

डोंबिवली रेतीबंदर, कोपर परिसरात कोणालाही रेती उपशाची परवानगी देण्यात आलेली नाही. बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येत आहे. डोंबिवली रेतीबंदर, कोपर परिसरात अशा प्रकारे कोणी बेकायदा रेती उपसा करीत असेल तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. यापूर्वी रेतीबंदर किनारी रेती उपशाचे बार्ज, ड्रेझर जप्त केले आहेत. रेतीवाहू डम्परवर टेहळणी ठेवून कारवाई करण्यात येईल.

प्रसाद उकार्डे, उपविभागीय अधिकारी, कल्याण