निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील परस्परविरोधी पक्षांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले असून या स्पर्धेचा पहिला अंक सेना-मनसेतील विकासकामांच्या श्रेयवादाच्या लढाईवरून पाहायला मिळाला. निमित्त होते शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते येथील नुकत्याच लोकार्पण झालेल्या बाबासाहेब पुरंदरे खुल्या नाटय़गृहाच्या शेजारील उद्यानाच्या उद्घाटनाचे. या उद्यानाचे नामकरण मनसेने प्रबोधनकार ठाकरे असे केले. विशेष म्हणजे दोनदा उद्घाटन होऊनही हा प्रकल्प अपूर्ण आहे.
अंबरनाथ नगर परिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या या खुल्या नाटय़गृहाचे गेल्याच आठवडय़ात लोकार्पण झाले होते. बाबासाहेब पुरंदरे खुले नाटय़गृह असे नामकरण करून ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या नाटय़गृहाचे अनावरण झाले. या वेळी मनसेचे स्थानिक नगरसेवक स्वप्निल बागूल व दत्तात्रय केंगरे या दोन नगरसेवकांच्या प्रभागाच्या हद्दीवर असलेल्या या नाटय़गृहाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने हे लोकार्पण इतक्यात होऊ नये, अशी या नगरसेवकांची मागणी होती. तसेच हा कार्यक्रम आम्हाला विचारात घेऊन करण्यात यावा, असेही त्यांचे मत होते. मात्र अपूर्ण अवस्थेत असलेल्या या नाटय़गृहाचे शिवसेनेने घाईत उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या नाटय़गृहाच्या परिसरात असलेल्या उद्यानाचे पुन्हा उद्घाटन करण्याचा निर्णय या दोन नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे गेल्याच आठवडय़ात लोकार्पण झालेल्या या नाटय़गृहाच्या परिसराचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा लोकार्पण झाले. सध्या शिवसेना व मनसे यांच्यामध्ये निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम भरविण्याची स्पर्धात लागलेली आहे.  

सारे काही श्रेयासाठी
या उद्घाटनावरून कोणतेही राजकारण आम्ही करत नसल्याचा निर्वाळा नगराध्यक्ष चौधरी यांनी दिला आहे. परंतु, अजूनही या नाटय़गृहाच्या आवारातील बालोद्यान, वाचनालय, जॉगिंग ट्रॅक, लॉन, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिक कट्टा आदी कामे पूर्णच झालेली नसून अजूनही अपूर्णावस्थेतच आहेत. त्यामुळे केवळ निवडणुका जवळ आल्यानेच या अपूर्ण विकासकामांची उद्घाटने होत असून त्यांचे श्रेय लाटण्याचाच या पक्षांचा हेतू असल्याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे.