पाचूबंदर येथील ‘दत्तधाम वसाहती’मधील महिलांची यशोगाथा

vs02पूर्वी कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला समाजाकडून हीन वागणूक मिळत असे. त्यातही ती व्यक्ती महिला असेल तर तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. कुष्ठरोग झाल्यामुळे समाजाकडून वाळीत टाकलेल्या अशा महिलांनी एकत्र येऊन स्वत:ची वसाहत स्थापन केली. वसईच्या पाचूबंदर येथे असलेली ‘दत्तधाम वसाहत’ही या महिलांच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीचे अनोखे प्रतीक आहे.

समाजाकडून वाळीत टाकल्याने आणि घरातून बाहेर काढल्यानंतरही जगण्याची जिद्द असलेल्या या महिला वसईच्या पाचूबंदर येथे एकत्र आल्या आणि दत्तधाम वसाहतीची निर्मिती झाली. वसईतील ललिताबेन राजाणी यांनी ही वसाहत स्थापन करण्यास मदत केली. ‘‘सुरुवातीला आम्हाला येथे राहण्यास खूप कष्ट करावे लागले, समाजाचे टोचून बोलणे जास्तच टोचायचे. अशातच किराणा मालाच्या दुकानात रेशन आणायला गेल्यास सामान घेतल्यानंतर त्याचे पैसे एका भांडय़ात टाकायचे आणि किराणावाला त्या पैशांवर पाणी शिंपडूनच ते पैसे हातात घ्यायचा. त्याचे वाईट वाटायचे आणि संतापही यायचा. यातून ‘राम रोटी’ नावाची संकल्पना राबवली,’’ असे ललिताबेन यांनी सांगितले. या संकल्पनेद्वारे ललिताबेन या स्वत: गावभर हिंडत गावातून खाद्यपदार्थ जमा करायच्या. हळूहळू इतर महिलांनीही तसे सुरू केले आणि त्यावर या महिलांची गुजराण सुरू झाली.

कुष्ठरोगींना शासनातर्फे जागा मिळवून देण्यामध्ये ललिताबेन यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीला येथे राहण्यास खूप कष्ट करावे लागले. वेळोवेळी पोटासाठी आणि निवाऱ्यासाठी हात पसरवावे लागले. मुलांचे शिक्षण, येथे स्थायिक होणे, आरोग्य सुविधा पुरवणे यांसाठी संघर्ष करावा लागला. वसईतील सामाजिक जाण असलेल्या लोकांनी वेळोवेळी मदत केली.

आज या वसाहतीत २० कुटुंबे असून ७५ ते ८०च्या आसपास लोकसंख्या आहे. शालन कोळी, यशोदा पितळे, पद्मा पासळे, देवकी शेळके, लक्ष्मी तरडे, लक्ष्मी दिघे यांसारख्या अनेक महिलांनी आपल्या रोगावर मात करत कुटुंब उभारले आहे.

शारीरिक व्याधीने त्रस्त असतानाही ज्या प्रकारे प्रगती केली, ते पाहता या कुष्ठरोगी महिला समाजाला प्रेरणादायी आहेत. बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांचे कार्य आम्हाला प्रेरणादायी असून त्यामुळेच ही वसाहत निर्माण करू शकलो, असे ललिताबेन यांनी सांगितले.

मच्छीमारांकडून मदत

खोचिवडे कोळीवाडा, किल्लाबंदर, लांगेबंदर, पाचूबंदर येथील मच्छीमार बांधवांनी उदात्त भावनेने मदत केली. मुबलक प्रमाणात मासळी मिळाली की मच्छीमार बांधव येथील वसाहतीतील लोकांना मासळी आणून द्यायचे. एवढेच नव्हे पाचूबंदर येथील काही मच्छीमारांच्या घरी दत्तधाम वसाहतीतील मुली आज सून म्हणून नांदत आहेत, असे ललिताबेन यांनी सांगितले.