07 March 2021

News Flash

किरकोळ कामांना कात्री, मोठय़ा प्रकल्पांचा धडाका

पालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या निधीपेक्षा किरकोळ विकास कामांवर वारेमाप खर्च होत असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; दीड कोटी शिलकीच्या अर्थसंकल्पात शिस्तीचे प्रतिबिंब

कल्याण : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गटारे, पायवाटा, पेव्हर ब्लॉक बसवणे अशा कामांची जंत्री मांडून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पात वेसण घालण्यात आली आहे. त्याच वेळी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आगामी आर्थिक वर्षांत मोठय़ा प्रकल्पांच्या आखणीची घोषणा करत सत्ताधारी शिवसेनेचा जाहीरनामाच मांडल्याचे दिसून येत आहे. सुमारे १९९७ कोटी ७९ लाख रुपये जमेचा आणि दीड कोटी रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी शुक्रवारी स्थायी समितीपुढे सादर केला. त्यात नव्या आर्थिक वर्षांत रस्ते, भुयारी गटारे, उड्डाणपूल, कचराभूमी अशा मोठय़ा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी करवाढीलाही फाटा देण्यात आला आहे.

राज्यातील एकंदर सत्तासमीकरण लक्षात घेता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होणारी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सत्ताधारी शिवसेना आणि सध्या विरोधी बाकांवर असलेल्या भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. पाच वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी ६५०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलाच घाम फोडला होता. यंदा राज्यातील समीकरणे बदलताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतील डॉ. विजय सूर्यवंशी यांची आयुक्तपदी नेमणूक केली आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी शिवसेनेच्या जाहीरनाम्याची छाप अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. आयुक्तांनी शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. २०१९-२० चा १४३४ कोटी ६२ लाख जमेचा आणि १२१३.५१ कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक २२१ कोटी ११ लाखांच्या शिल्लक रकमेसह सादर करण्यात आले. तसेच २०२०-२१ चा १९९७ कोटी ७९ लाख जमेचा आणि १९९६ कोटी ७९ लाख खर्चाचा आणि एक कोटी ५१ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर तयार करण्यात आला. महसुली उत्पन्नाचे निश्चित स्रोत विचारात घेऊन फुगीर आकडय़ांचा खेळ न खेळता वास्तवदर्शी आकडे मांडण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे. सुधारित अंदाजपत्रक ५६३ कोटी १७ लाखाने वाढीव आणि मूळ अंदाजपत्रक १९८ कोटी २० लाखाने घटविण्यात आले आहे.

पालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या निधीपेक्षा किरकोळ विकास कामांवर वारेमाप खर्च होत असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले आहे. शहरात समूह विकास योजना राबवण्यात येणार आहे. झोपु योजनेतील घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी २८५ कोटींचा उपलब्ध निधी केवळ स्मार्ट प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन, बारावे येथे २०० मेट्रिक टनाचे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कल्याण, डोंबिवली शहरे निवासयोग्य, उत्तम दर्जाचे, स्वच्छ, सुंदर करण्याला प्राधान्य असेल, असे आयुक्तांनी सांगितले.

विकासापासून दूर राहिल्याची खंत

मुंबई उपनगराची एक महत्त्वाची नाडी असणारी कल्याण डोंबिवली शहरे वर्षांनुवर्षे विकासापासून खूप दूर राहिल्याची खंत अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या संदर्भात यापूर्वी नेहमी मागचा क्रमांक मिळविला, पण येत्या काळात नागरिक, कर्मचारी यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या १० शहरांत आणण्याचा मानस आयुक्तांनी वर्तविला आहे.

शहरात रस्ते, उड्डाणपूल, युथ

पार्क, फुलपाखरू उद्यान, सिटी पार्क, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका सुरू करणे, कल्याण ऐतिहासिक शहराचे महत्त्व ओळखून शहरातील अनेक महत्त्वाची ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यावर भर देणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोफत सुविधा

पालिका हद्दीतील दिव्यांग, डायलिसिस, एड्सग्रस्त, कर्करुग्ण, गरोदर महिला यांना केडीएमटीच्या प्रवासी सेवेत १०० टक्के सवलत देण्यात येणार आहेत

प्रत्येक प्रभागात आपला दवाखाना

रुग्णांना प्रत्येक वेळी घराच्या आसपास पालिकेची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक प्रभागात आपला दवाखाना केंद्र, प्रभाग दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. पालिका हद्दीत माफक दरात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:10 am

Web Title: kalyan dombivali mahapalika budget akp 94
Next Stories
1 भुयारी गटार योजना वादाच्या भोवऱ्यात
2 नौपाडा येथे इमारतीला आग
3 शहरविकास विभागात जागता पहारा
Just Now!
X