|| भगवान मंडलिक

कल्याण : शासनाच्या नियोजनानुसार कल्याण-डोंबिवली पालिकेला येत्या तीन महिन्यांच्या काळात पहिल्या टप्प्यात तीन लाख २० हजार लाभार्थीना करोना विषाणू लशीचे लसीकरण करायचे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पालिकेची सहा रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि सहा खासगी रुग्णालयांमधील लाभार्थीना लस देण्याचा वेग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेला दररोज २५०० करोना लस कुप्यांची गरज आहे. या मागणीसाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शासनाच्या आरोग्यसेवेच्या पुणे, ठाणे येथील अतिरिक्त संचालकांकडे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर शासन नियोजनाप्रमाणे लाभार्थीचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळा येऊ शकतो, असे पालिकेने शासनाच्या निदर्शनास आणले आहे.

महापालिकेच्या सहा आरोग्यसेवा केंद्रांमध्ये दररोज २०० लाभार्थीना आठवडय़ातून सहा दिवस असे चार आठवडे लसीकरण केले तर २८ हजार ८०० लाभार्थीचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. अशाच पद्धतीने सहा खासगी रुग्णालयातील आठवडय़ातील सात दिवस २०० लाभार्थीचे दररोज एकूण चार आठवडे लसीकरण केले तर ३३ हजार ६०० लाभार्थीना लस मिळू शकते. या नियोजनाप्रमाणे लसीकरण पार पडण्यासाठी दररोज २५०० करोना कुप्यांची पालिकेला गरज असल्याने हा वाढीव पुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी आरोग्यसेवेच्या अतिरिक्त संचालकांकडे केली आहे.

सध्याच्या १२ लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त कल्याण-डोंबिवलीत चार वाढीव लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थीची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हे नियोजन आवश्यक आहे. फेब्रुवारीमध्ये कोव्हिशिल्ड लशीचा ११ हजार ५०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांना मार्चमध्ये याच लशीची मात्रा द्यावी लागणार आहे. सद्य:स्थितीत या लशीचा पुरेसा साठा विभागीय भांडार कक्षात उपलब्ध नसल्याचे पालिकेने आरोग्यसेवा उपसंचालकांच्या निदर्शनास आणले आहे.  पालिकेला गेल्या दोन महिन्यांत कोव्हिशिल्ड लशीच्या २९ हजार ५०० कुप्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामधील २४ हजार ६४७ कुप्या वापरण्यात आल्या आहेत. शासन नियोजनाप्रमाणे लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मुबलक करोना लशीच्या कुप्या पालिकेला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

डोंबिवली पूर्वेत लसीकरण केंद्राची मागणी

डोंबिवली पूर्वेत पालिकेचे एकही करोना लसीकरण केंद्र नाही. पूर्व, पश्चिम भागांत मध्यवर्ती ठिकाणी पालिकेने करोना लसीकरण केंद्रे सुरू केली तर रहिवासी स्वेच्छेने लस घेण्यासाठी जातील. डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर रुग्णालयात केंद्र असले तरी तेथे खूप गर्दी असल्याने रहिवासी तिकडे पाठ फिरवतात. खासगी रुग्णालयांमध्ये दररोज २०० लाभार्थीना लस देण्यात येत असली तरी ही संख्या ३०० ते ४०० करण्यात यावी. करोना प्रतिबंधासाठी वाढीव लसीकरण केंद्रे शहराच्या विविध भागांत सुरू करावीत, अशी मागणी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली.