|| किशोर कोकणे

कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांच्या गर्दीमुळे कसारा लोकल गाठणे कठीण; ठाकुर्ली, डोंबिवलीत उतरून मागून येणाऱ्या गाडीची प्रतीक्षा

वाढत्या नागरीकरणामुळे कसारासारख्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील परिसरात लोकवस्ती वाढत चालली असली तरी, येथून मुंबई, ठाण्याच्या दिशेने दररोज ये-जा करणाऱ्या लोकल प्रवाशांना अजूनही मर्यादित प्रवासी सुविधांवरच अवलंबून राहावे लागत आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येताना होणारा लोकल प्रवास आरामदायक असला तरी, घराकडे परतताना मात्र, या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईतून सुटणाऱ्या कसारा दिशेकडील लोकलमध्ये ठाणे रेल्वे स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना शक्य होत नसल्याने या प्रवाशांना ठाकुर्ली किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकात जाऊन कसारा लोकल पकडावी लागत आहे. या खटपटीत या प्रवाशांना प्रवासात किमान एक तास अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

कसारा भागातून लाखो नोकरदार दररोज ठाणे आणि नवी मुंबईत जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक सतत कोलमडू लागले आहे. दररोज जलद आणि धिम्या मार्गावरील लोकलगाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असतात. याचा सर्वाधिक फटका कसाऱ्याहून ठाण्याच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. ठाण्याहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी गर्दीच्या वेळेत ठाणे ते कसारा एकही खास लोकलगाडी नसल्याने येथील प्रवाशांना ठाण्याहून लोकल पकडण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा ठाण्याहून लोकलच्या दरवाजात लटकूनच प्रवास करावा लागतो आहे. तर, काहींना नाइलाजास्तव प्रथम श्रेणीच्या प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गर्दीतील अपघात टाळण्यासाठी येथील प्रवाशांनी आता ठाकुर्ली किंवा डोंबिवली स्थानकातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे.

कसारा मार्गावरील बहुतेक लोकल डोंबिवली आणि कल्याणमध्ये काही प्रमाणात रिकाम्या होतात. त्यामुळे कसारा पट्टय़ातील अनेक प्रवाशांनी आता डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरून प्रवास करू लागले आहेत. कसारा भागातील प्रवासी डोंबिवली किंवा कल्याण लोकल पकडून ठाकुर्ली किंवा डोंबिवली स्थानक गाठतात. त्यानंतर मागून येणारी टिटवाळा, आसनगाव किंवा कसारा लोकल डोंबिवली किंवा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात रिकामी झाल्यानंतर हे प्रवासी त्या लोकलमध्ये चढत आहेत. या सर्व द्राविडी प्राणायामामुळे या प्रवाशांचा प्रवासाचा एक तासाहून अधिक काळ वाढत असल्याचे चित्र आहे.

‘प्रशासनाने ठाण्याहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सोडण्यास सुरुवात केली किंवा ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवलीतील प्रवाशांनी मुंबईतून येताना ठाणे, डोंबिवली किंवा कल्याण लोकलमधून प्रवास केल्यास ही समस्या काहीशी सुटेल,’ असे टिटवाळा येथील प्रवासी मयूर दाभाडे यांनी सांगितले.

मुंबई ते कसारा लोकलच्या फेऱ्या

मुंबईहून दिवसभरात टिटवाळा येथे २९, कसारा येथे १५ आसनगाव येथे १८ गाडय़ा सुटतात. यातील सायंकाळी ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत कसारा येथे जाणाऱ्या ४, आसनगाव येथील ५ आणि टिटवाळा येथे जाण्यासाठी केवळ ९ गाडय़ाच उपलब्ध आहेत. यातील एकही गाडी ठाणे ते कसारा नाही.

कसारा मार्गावरून मुंबईच्या दिशेने दिवसभरातील कसारा येथून १७, टिटवाळा येथून २९ आणि आसनगाव येथून १७ गाडय़ा सुटतात. यातील गर्दीच्या वेळेत म्हणजेच, पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत टिटवाळा येथून ११, कसारा येथून ६ आणि आसनगाव येथून ८ लोकल सुटतात.

मी दररोज आटगाव ते ठाणे प्रवास करते. ठाण्याहून पुन्हा घरी जाताना लोकलमध्ये शिरणे शक्य होत नाही. दररोज तीन ते चार लोकल सोडाव्या लागतात. त्यानंतर एखादी लोकल मिळते. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरून ठाकुर्लीहून कसाऱ्याच्या लोकल पकडते.  – पायल सराफ,  प्रवासी