भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन २० दिवसांपूर्वी विविध विभागातील ५४६ वैद्यकीय पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे ठरविण्यात आले. पालिकेने आठवडय़ाभरापासून राबविलेल्या या निवड प्रक्रियेत ५४६ विविध संवर्गातून २०३ हून अधिक उमेदवार पात्र ठरले. मात्र, कागदपत्र पडताळणीनंतर जेमतेम ५० ते ६० उमेदवार कामावर हजर होण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे करोना संकट काळात महापालिकेस आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे.

कक्ष परिचर (वॉर्ड बॉय) पदासाठी ४२६ उमेवारांनी अर्ज केले होते. या पदासाठी दहावीपर्यंत शैक्षणिक पात्रता आणि दोन वर्षांचा रुग्णालयातील कामाचा अनुभव प्रशासनाला अपेक्षित होता. यापैकी एकाही उमेदवाराला अनुभव प्रमाणपत्र देणे शक्य झालेले नाही. तसेच हे उमेदवार शैक्षणिक पात्रताही पूर्ण करू शकलेले नाहीत. या नेमणुका तात्पुरत्या आणि करोनाकाळापर्यंतच असल्याने उमेदवार या निवडीकडे फिरकले नसल्याची चर्चा आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्णांची संख्या ५००हून अधिक आहे. वाढती रुग्ण संख्या आणि पावसाळ्यातील साथ रोगांचा फैलाव लक्षात घेता प्रशासनाने उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सोबतीला वाढीव कर्मचारी असावेत यासाठी ही विशेष भरती मोहीम राबविली होती. या भरतीसाठी प्रशासनाने दोन ते तीन वेळा जाहिराती दिल्या होत्या. राज्याच्या विविध भागातून या भरतीसाठी काही मोजक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. टाळेबंदीमुळे उपनगरी गाडय़ा, रस्ते वाहतूक बंद असल्याने अनेक उमेदवार शैक्षणिक, अनुभवी असूनही कागदपत्र पडताळणीसाठी पालिकेत येऊ शकले नाहीत. अनेक उमेदवारांना विशेषत: रुग्णालयात कर्मचारी, डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनुभवाचे प्रमाणपत्र मिळाले नाही. करोनाच्या भीतीने हे काम नको म्हणून अनेकांनी प्रक्रिया पार पाडल्या नाहीत. छायांकित प्रत काढून देणारी दुकाने बंद असल्याने अनेकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांच्या नक्कल प्रती काढता आल्या नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे उमेदवार या निवड प्रक्रियेत सामील होऊ शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरला नाही. अनुभव, शैक्षणिक प्रमाणपत्र अर्जासोबत जोडली नाहीत. काही उमेदवारांना जवळ अनुभव असूनही विविध आस्थापनांमधून अनुभवाचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. ते अपात्र ठरले. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या मागणीप्रमाणे निवड, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना हजर करून घेतले आहे.

-अरुण वानखेडे, साहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन विभाग