रेल्वेच्या पुलावर रात्री आठ वाजल्यापासून तुळई बसवण्याचे काम

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलाच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या भागावर तुळई बसवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार असून त्यासाठी येत्या शनिवारी, रविवारी कोपरी पूल रात्री आठनंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र, पुढच्या आठवडय़ात येणाऱ्या २६ जानेवारीच्या सुट्टीला जोडून अनेकजण शनिवारपासूनच बाहेरगावी जाण्याची शक्यता असल्याने या दोन दिवसांत रात्री ठाणे आणि आसपासच्या शहरांतील पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या दिशेने असलेल्या कोपरी उड्डाणपुलावर तुळई बसविण्याचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गेल्या शनिवारी पूर्णत्वास नेले. अशाच प्रकारची तुळई कोपरी पुलाच्या रेल्वेमार्गावरील भागात बसवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. ही लोखंडी तुळई ६३ मीटर लांब आणि १०२ टन असणार आहे. या कामासाठी कोपरी रेल्वे पुलावरील वाहतूक रात्री ८ वाजेपासून बंद करण्याची रेल्वे प्रशासनाची विनंती वाहतूक शाखेनेही मान्य केली आहे. परिणामी हे दोन दिवस रात्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा ही शहरे कोंडण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी रेल्वे पूल अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीतून सुटका मिळावी यासाठी रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये एमएमआरडीएने त्यांच्या भागातील काम ७० ते ८० टक्के पूर्ण केले आहे. या कामाचा भाग म्हणून रविवारी पहाटे कोपरी पुलाजवळील भुयारी मार्गावर एमएमआरडीएने सात लोखंडी तुळई बसविण्याचे काम पूर्ण केले. एमएमआरडीएने शनिवारी रात्री ११ नंतर या कामाला सुरुवात केली होती. एमएमआरडीएने त्यांचे काम अवघ्या सहा तासांत पूर्ण केल्याने आता रेल्वे प्रशासनाला रेल्वेच्या हद्दीतील पुलावर लोखंडी तुळई बसवाव्या लागणार आहेत.

शक्तिशाली क्रेनची मदत

रेल्वेकडून या पुलावर सात लोखंडी तुळई बसवणार आहेत. प्रत्येकी ६३ मीटर लांब आणि प्रत्येकी १०२ टन वजनाच्या तुळई आहेत. एमएमआरडीएपेक्षा दुप्पट मोठय़ा व तिप्पट वजनाच्या या तुळई आहेत. त्यामुळे याठिकाणी १ हजार टन वजन पेलू शकेल अशा क्रेन आणाव्या लागणार आहेत. याच्या संपूर्ण नियोजनासाठी तीन ते चार तास लागतात. त्यानंतर कामाला सुरुवात होत असते. शनिवारी चार व रविवारी तीन तुळई बसविण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीची शक्यता

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नोकरदारांना अद्यापही रेल्वे प्रवासास मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकजण त्यांची खासगी वाहने घेऊन मुंबईच्या दिशेने जात असतात. रात्री या मार्गावरून ७० हजारहून अधिक वाहने ये-जा करत असतात. या सर्व वाहनांना इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याने त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईहून ठाण्यात येणारी वाहतूक रात्री मुलुंड, मॉडेला चेकनाका मार्गे तीन हात नाका येथे येणार आहे. या मार्गावर मेट्रो निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. तर, जड वाहने नवी मुंबई, महापे, शिळफाटा, मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून वळविण्यात आली असून हे मार्ग अत्यंत खराब झाले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. ठाण्याहून मुंबईत जाणाऱ्या वाहनांना कळवा, ऐरोली मार्गे वळविण्यात येणार आहे. या भागात कळवा पुलाचे काम असल्याने त्याचा परिणामही या मार्गावर होणार आहे.

रेल्वे वाहतूक निर्विघ्न

रेल्वेकडून मध्यरात्री मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे फारसा परिणाम जाणवणार नाही, असे रेल्वेच्या एका अभियंत्याने सांगितले.