वयाच्या नव्वदीतही श्रोत्रीबाईंकडून संस्कृतचे धडे

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपण जसे शिकू शकतो, तसेच आपल्याजवळचे ज्ञान कोणत्याही वयात दुसऱ्याला देऊही शकतो. ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिली की वाढते, या तत्त्वावर अढळ श्रद्धा असणाऱ्या लीला मोरेश्वर श्रोत्री या वयाची नव्वदीपार झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका अजूनही चरई विभागातील त्यांच्या घरी विद्यार्थ्यांना संस्कृतचे मार्गदर्शन करीत आहेत. आठवी ते दहावीचे विद्यार्थी खास संस्कृत शिकण्यासाठी त्यांच्याकडे दररोज संध्याकाळी येतात. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल ७१ वर्षे त्यांचा हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

ठाण्यातील समर्थ विद्यालयात २२ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या लीलाबाई त्यानंतर आता ३० वर्षांहून अधिक काळ घरी शिकवणी वर्ग घेत आहेत. संस्कृत विषय शिकविण्यात श्रोत्रीबाई अतिशय पारंगत आहेत. आर्थिकदृष्टय़ा गरीब घरातील मुलांना चांगले मार्गदर्शन करता यावे, हा त्यांच्या शिकवण्यामागचा हेतू. त्याच भावनेने त्यांनी विद्यार्थ्यांना जीव लावला. त्यामुळे श्रोत्रीबाईंवर अनेक विद्यार्थ्यांनी आईसारखे प्रेम केले. मुळात त्यांच्या शिकवणी वर्गाचे शुल्क अगदी माफक. त्यातही गरीब मुलांकडून पैसे घ्यायचे नाहीत, उलट स्वत: अथवा परिचितांकडून देणग्या मिळवून त्यांना शिक्षणासाठी मदत करायची, हे श्रोत्रीबाईंचे तत्त्व. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांंनीही बाईंपासून हा धडा घेतला आहे. वयाची पन्नाशी आणि साठी पार केलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आपल्या वार्षिक उत्पन्नातील ठरावीक रक्कम बाजूला काढून श्रोत्रीबाईंच्या या योजनेसाठी देतात. लग्नापूर्वी अकरावी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण झालेल्या श्रोत्रीबाईंनी पुढे संसार सांभाळून एम.ए. बी.एड. केले.

बहुतेकदा वार्षिक परीक्षा संपून शिकवणी वर्ग बंद झाले की विद्यार्थ्यांचा ‘क्लास’शी फारसा संपर्क राहत नाही. मात्र श्रोत्रीबाईंच्या शिकवणी वर्गातील शेकडो विद्यार्थी अजूनही त्यांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या वाढदिवसाला फोन करून त्या त्याला शुभेच्छा देतात. त्यांची अधूनमधून चौकशी करतात. नव्वदीनिमित्त गेल्या एप्रिल महिन्यात त्यांच्या समस्त विद्यार्थ्यांनी गडकरी रंगायतनमध्ये त्यांचा भव्य सत्कार केला.  अकरावी मॅट्रिक झाल्या झाल्या पेण येथील पेण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली. म्हणजेच शिकविण्याचा वसा घेऊन त्यांना आता ७१ वर्षे झाली. ‘संस्कृत’प्रमाणेच श्रोत्रीआजी पाककला निपुण आहेत. निरनिराळे पदार्थ बनवून आप्तस्वकियांच्या भेट म्हणून पाठविणे हा त्यांचा छंद आहे.  हाताचा चांगला व्यायाम होतो म्हणून अजूनही त्या नियमितपणे जात्यावर दळतात.