मान्यवरांची मांदियाळी, संगीताची मेजवानी, युवोन्मेष आणि ठाणे मानिबदू पुरस्कारांनी नटलेला असा ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’ पाहण्याची संधी शनिवारी ठाणेकर रसिकांना मिळणार आहे. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना देण्यात येणाऱ्या मानवंदनेसह हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा सन्मान करणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

दरवर्षी ठाणेकरांसाठी इंद्रधनुतर्फे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे २४ वे वर्ष असून यंदाही नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी ठाणेकरांसाठी असणार आहे. ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’ सोहळा (उद्या) शनिवार, १८ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून रंगणार आहे. यंदाचा हा सोहळा ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने होत असून दोन सत्रात हा महोत्सव पार पडणार आहे. पहिल्या सत्रात ‘नटसम्राटाला आदरांजली’ या दृक्श्राव्य, संगीतमय कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या मानवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, सागर तळाशिलकर, संवादिनी वादक अमित पाध्ये, मकरंद जोशी यांचा समावेश असणार आहे. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी प्रतिभावंतांचे योगदान या संकल्पनेवर आधारित ‘माहीरे’ म्हणजेच मायमराठीतले हिरे हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील दिग्गज मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा असा हा संगीतमय कार्यक्रम असणार आहे. कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमात सध्याचे सुप्रसिद्ध गायक कलावंत शरयू दाते, अमृता नातू, जयदीप बगवाडकर, नचिकेत देसाई, कृत्तिका बोरकर सहभागी होणार आहेत.

यंदाच्या रंगोत्सवाचे संहितालेखन आणि निवेदन सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे असून त्यांच्यासोबत अभिनेते पुष्कर श्रोत्री निवेदन करणार आहेत. सहा तासांचा हा भव्यदिव्य सोहळा रसिकांसाठी संगीत, नाटय़, साहित्याची मेजवानी ठरणार आहे. गडकरी रंगायतन येथे आयोजित  या सोहळ्यानिमित्ताने पुरस्कार सोहळाही संपन्न होणार आहे. या वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील तरुणांना युवोन्मेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच वेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ ठाणेकर व्यक्तीला इंद्रधनुतर्फे ‘ठाणे मानबिंदू’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

* काय? इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव

* कुठे? गडकरी रंगायतन, ठाणे</p>

* कधी? शनिवार, १८ जानेवारी, सायं ५ वा.पासून