‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाला पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद; दहावी, बारावीनंतरच्या शैक्षणिक पर्यायांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील टिपटॉप प्लाझा सभागृहाचा परिसर बुधवारी सकाळी विद्यार्थी-पालकांच्या गर्दीने भरून गेला होता. या ठिकाणी जमलेल्या बहुसंख्यांच्या चेहऱ्यावर दुपारी एकनंतर जाहीर होणाऱ्या बारावीच्या निकालाची उत्सुकता होती पण त्याचबरोबर ‘बारावीनंतर काय’ हा प्रश्नही डोकावत होता. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी या सर्वानी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ शिबिराला हजेरी लावली होती. दहावी-बारावीनंतर काय करायचे, असा प्रश्न घेऊन सकाळी ९.३० वाजता टिपटॉप प्लाझा सभागृहात दाखल झालेल्यांच्या शंकांचे सायंकाळी बाहेर पडताना पूर्ण समाधान झाल्याचे चित्र होते. ‘मार्ग यशाचा’ उपक्रम आज, दुसऱ्या दिवशीही याच ठिकाणी पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती देण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘मार्ग यशाचा’ उपक्रम ठाण्यात पार पडत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या शहरांसह पालघर जिल्ह्यांतूनही विद्यार्थी-पालक मोठय़ा संख्येने टिपटॉप प्लाझा येथे जमले होते.

ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, मानसोपचारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा आणि अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीच्या मंजिरी वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिसंवादाचे औपचारिक उद्घाटन झाले.

या वेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मार्ग यशाचा हा उपक्रम सुरू करण्यामागची पाश्र्वभूमी सांगितली. ‘दहावी-बारावीची वर्षे ही यातनादायक वर्षे असतात. ही अवस्था अत्यंत भीतिदायक असते. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मार्ग सापडणे किंवा दिशा दाखवणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सगळ्यांच्या मनात निर्माण होणारा गोंधळ कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे,’ असे कुबेर यांनी या वेळी सांगितले.

ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, मानसोपचारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांनी उद्घाटन सत्रामध्ये उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर साठे महाविद्यालयाचे प्रा. अनिल देशमुख यांचे ‘नीट’ परीक्षेबद्दलचे विवेचन पार पडले. तर दुपारच्या सत्रामध्ये कला, वाणिज्य आणि ललित कला या क्षेत्रांतील नव्या करिअरविषयी अनुक्रमे दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उपक्रमाचे प्रायोजक

‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय ‘युक्ती’ तसेच पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘पारूल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे नॉलेज पार्टनर ‘आयटीएम’ हे आहेत.

आजची संधी चुकवू नका

ज्या विद्यार्थी-पालकांना बुधवारी पहिल्या दिवशीच्या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होता आले नाही, त्यांना आज, गुरुवारी होत असलेल्या शिबिरात सहभागी होण्याची संधी आहे. गुरुवारच्या सत्राचा प्रारंभ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हरीश शेट्टी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवसाप्रमाणेच अनिल देशमुख यांचे ‘नीट’ विषयीचे व्याख्यान, विवेक वेलणकर यांचे ‘आरोग्यशास्त्र आणि तंत्रज्ञान’ क्षेत्रातील नव्या संधी याविषयावर व्याख्यान होणार आहेत.

ठाण्यातील तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात विद्यार्थ्यांना करिअर आणि शिक्षणाच्या विविध पर्यायांविषयी मार्गदर्शनासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘मार्ग यशाचा’ उपक्रमातील उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया