वाहतूक पोलिसांचे महापालिकांना पत्र; बेकायदा पार्किंगवर कारवाईची विनंती

इमारत बांधकामाला परवानगी देताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी आखून दिलेले नियम धाब्यावर बसवून पार्किंगच्या जागा हडप करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, अशी विनंती ठाणे वाहतूक पोलिसांनी आपल्या हद्दीतील महापालिका तसेच नगरपालिकांना केली आहे. ठाण्यासह सर्वच शहरांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत असताना प्रत्येक इमारतीत वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे का, याची तपासणी करण्याची सूचनाही पोलिसांनी पालिकांना केली आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांत मोठी गृहसंकुले उभी राहत असून त्यासोबतच वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या वाहनसंख्येला रस्ते अपुरे पडत असताना या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही बिकट होत चालला आहे. ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी अशा भागात जुन्या आणि अधिकृत इमारतींचा भरणा आहे. या इमारतींमध्ये पुरेशी वाहनतळ व्यवस्था नाही. काही इमारतींमध्ये तर चारचाकी वाहने उभी रहातील अशी व्यवस्था नाही. व्यावसायिक आस्थापनांचा हा भार रस्त्यावर येऊ लागला आहे. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचे पालन होते की नाही ते पाहायला हवे अशी स्पष्ट भूमिका आता पोलिसांनी पत्रात मांडली आहे.

वाहनतळाच्या जागेवर बेकायदा बांधकाम करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा, अशी मागणी या पत्रात पोलिसांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमधील कलम ८५ नुसार व्यावसायिक आस्थापनांना इमारतीमध्ये वाहनतळाची सोय असणे अनिवार्य आहे. मात्र अशा इमारतींमध्ये अनेक व्यावसायिकांनी वाहनतळासाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदा बांधकाम केले असून त्याचा वापर आस्थापनांसाठी केला जात आहे. या संदर्भात विविध नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही बाब निदर्शनास आली आहे, असे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे.

‘इमारतींची पाहणी करा’

बांधकाम परवानगी देताना वाहनतळासाठी आरक्षित केलेल्या जागेवर आस्थापनांनी अतिक्रमण केले असून या अतिक्रमणामुळे आस्थापना आणि ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ कोंडी होते. त्यामुळे सर्वच आस्थापनांची पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी महापालिकांकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.