डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीवरील माणकोली उड्डाण पुलाच्या कामास सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया आणि बांधकाम आराखडय़ांच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डोंबिवलीहून ठाणे शहराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल असणार आहे. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे हे अंतर २५ मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या कामाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत सहभागी कंत्राटदार कंपन्या, ही प्रक्रिया हाताळणारे ‘एमएमआरडीए’चे अधिकारी यांची नावे उघड झाली तर नाहक राजकीय व अन्य प्रकारचे दबाव सुरू होतात आणि प्रक्रियेत अडथळे येण्यास सुरुवात होतात. माणकोली उड्डाण पुलाचे काम चांगल्या ठेकेदार कंपनीकडून व्हावे, असा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न सुरू आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. डिसेंबरमध्ये माणकोली उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या काही बांधकाम कंपन्यांनी माणकोली उड्डाण पुलाचे आराखडे ‘एमएमआरडीए’ला सादर केले आहेत. काही बांधकाम कंपन्यांनी पोहच रस्ता उंच आणि पूल खाली असे आराखडे केले आहेत. पुलाचे हे गणित जुळणार नाही. त्यामुळे या कंपन्यांना सुधारित आराखडे सादर करण्यास सांगितले आहे. काहींनी ‘एमएमआरडीए’कडे बांधकाम आराखडे तयार करण्यासाठी काही विषयांवर स्पष्टीकरण मागितले आहे. त्याची उत्तरे ‘एमएमआरडीए’कडून ठेकेदार कंपन्यांना देण्याचे काम सुरू आहे. असे सर्वसमावेशक बांधकाम आराखडे ‘एमएमआरडीए’कडे आले की, सर्वमताने यामधील उत्तमोत्तम बांधकाम कंपनीची पूल उभारण्याच्या कामासाठी निवड करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
माणकोली उड्डाण पुलाच्या दुतर्फा वन विभाग, सागरी किनारा नियमन (सी.आर.झेड) विभागाची काही जमीन आहे. या दोन्ही विभागांच्या अत्यावश्यक परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. या भागात खारफुटीचे जंगल आहे. या जंगलाच्या बदल्यात वन विभाग काय प्रस्ताव देतो हे आम्ही पडताळून पाहत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.
माणकोली पुलाच्या रेतीबंदर (डोंबिवली) बाजूला पोहच रस्त्याच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात बेकायदा चाळी उभारण्याची कामे सुरू आहेत. चाळी हटवण्याची पूर्ण जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची असणार आहे.