आरोपीला २४ तासात अटक
ठाण्यातील शीळगाव भागातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना सोमवारी घडली असून याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक आणि डायघर पोलिसांनी संयुक्त तपास करून आरोपीला अवघ्या २४ तासात अटक केली आहे.
शमीन इलीयास अन्सारी (२०) असे आरोपीचे नाव असून तो शीळगाव परिसरात राहतो. याच परिसरात पिडीत मुलगी राहत असून ती गतीमंद आहे. सोमवारी सायंकाळी ती घराबाहेर खेळत असताना त्याने तिला अभयनगर येथील शिळगावकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याशेजारील मुंज्याचा टेपजवळील झुडपात नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. रात्री उशीरापर्यंत ती घरी परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांनाती मुंज्याचा टेप जवळील झुडुपात बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्यासोबत काहीतरी गैरकृत्य झाल्याचा संशय आल्याने कुटुंबीयांनी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे वैद्यकीय तपासणी दरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याची बाब समोर आली.
त्यानुसार, या प्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी. कदम आणि डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.काटकर यांच्या पथकाने संयुक्त तपास करून आरोपीला मंगळवारी रात्री जेरबंद केले, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.