18 January 2019

News Flash

महापालिकेतील अस्वच्छतागृह

स्वच्छतेचे धडे देणाऱ्या मिरा-भाईंदर पालिकेच्या स्वच्छतागृहाचीच दैन्यावस्था

महापालिकेचे अधिकारी बसत असलेल्या दालनातील शौचालय पान आणि तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी अक्षरश: रंगून गेले आहे.

स्वच्छतेचे धडे देणाऱ्या मिरा-भाईंदर पालिकेच्या स्वच्छतागृहाचीच दैन्यावस्था

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ही म्हण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सध्या चपखल लागू होत आहे. लोकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या महानगरपालिकेच्या मुख्यालयातील तळमजल्यावरच्या एका दालनातील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था पाहिली तर हे सहज लक्षात येते. महापालिकेचे अधिकारी बसत असलेल्या दालनातील शौचालय पान आणि तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी अक्षरश: रंगून गेले आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या महापालिकेचे स्वच्छ अभियान हेच का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

गुरुवारी विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनीदेखील उपस्थितांना स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केल होते.

मुख्यालयातील तळमजल्यावर महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र आहे. जन्म आणि मृत्यू दाखला देण्यासोबतच कराचा भरणादेखील या केंद्रात केला जातो. या केंद्रातच आतल्या बाजूला अधिकाऱ्यांची दालने आहेत. यातील एक दालन सध्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे काम या दालनातून चालत असल्याने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच सर्वेक्षणाच्या ऑनलाइन घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी यांची या दालनात उठबस होत असते. परंतु या दालनात असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था मात्र वर्णनही करता येणार नाही इतकी वाईट झाली आहे. सर्वत्र पानतबांखूच्या पिचकाऱ्या, अस्वच्छता असून हे स्वच्छतागृह कित्येक दिवसात स्वच्छ केले आहे की नाही याची शंका येण्याइतपत त्याची दुरवस्था झाली आहे.

एका दक्ष नागरिकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने या स्वच्छतागृहाचे छायाचित्र काढून ते महापालिकेच्याच स्वच्छता अ‍ॅपवर पोस्ट केले आहे. किमान अ‍ॅपवर तक्रार झाल्यानंतर तरी महापलिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

लोका सांगे..

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेची प्रचंड धडपड सुरू आहे. स्वच्छता अ‍ॅपचा वापर करा आणि स्वच्छतेबाबतच्या आपल्या तक्रारींचे समाधान करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु महापालिकेच्या स्वत:च्याच मुख्यालयातील स्वच्छतागृहांची देखभाल करण्याकडे मात्र प्रशासनाला वेळ नाही अशी परिस्थिती आहे.

 

First Published on January 13, 2018 3:43 am

Web Title: mira bhayandar municipal corporation swachh bharat abhiyan