दोन केंद्रांच्या इमारती बांधून तयार; परंतु पालिकेकडे केवळ ९९ कर्मचारी
तब्बल १२ लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या मीरा-भाईंदर शहरात महापालिकेकडे केवळ ९९ अग्निशमन कर्मचारीच आहेत. पुरेसे कर्मचारी नसल्याने महापालिकेची बांधून तयार असलेली दोन अग्निशमन केंद्रे अद्याप सुरूच होऊ शकली नाहीत.
महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी २००२ मध्ये त्या वेळची सुमारे चार लाखांची लोकसंख्या गृहीत धरून कर्मचाऱ्यांची १२७ पदे मंजूर करण्यात आली. आज चौदा वर्षांनंतर लोकसंख्या जवळपास तिप्पट झालेली असतानाही कर्मचाऱ्यांची संख्या मात्र रोडावली आहे. मंजूर पदांपैकीही २८ पदे आजही रिक्तच आहेत. त्यामुळे शहराचा गाडा ९९ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. या ९९ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे तीस कर्मचारी हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाले आणि त्यांना अग्निशमन विभागात काम करण्याचे प्रशिक्षण देऊन सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. अग्निशमन सेवा २४ तास सुरू असल्याने हे कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करतात. त्यामुळे एका वेळी केवळ ३३ कर्मचारीच कामावर हजर असतात. त्यातही कोणी आजारी किंवा रजेवर असला तर उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या जोरावरच अग्निशमन दलाचा कारभार सुरू असतो. हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या चार अग्निशमन केंद्रांसाठीच कमी पडत आहेत. त्यामुळे मीरा रोड येथील कनाकिया व भाईंदर पश्चिमेकडून मीरा रोडला जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दोन अग्निशमन केंद्रांसाठी महापालिकेकडे कर्मचारीच उपलब्ध नाहीत. परिणामी ही दोन्ही केंद्रे निव्वळ धूळ खात उभी आहेत.

कर्मचाऱ्यांची भरती रखडली
शासकीय नियमानुसार प्रत्येक दहा चौ.मी.साठी एक अग्निशमन केंद्र उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार मीरा-भाईंदर शहरासाठी आठ केंद्रे असणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेने सहाच अग्निशमन केंद्रे बांधली आहेत. त्यातली चारच केंद्रे सुरू असून दोन केंद्रे कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद अवस्थेत उभी आहेत. यातील एका केंद्रावर पालिकेने तब्बल नव्वद लाख रुपये खर्च केले आहेत. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेने ३५० कर्मचारी अग्निशमन केंद्रासाठी तैनात करायला हवेत. त्यानुसार महापालिकेने या विभागासाठी २२४ आणखी पदे निर्माण करून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून शासनाला यावर निर्णय घ्यायला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही.