मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ऑनलाइन कर भरणी ही रोख भरणीपेक्षा अधिक

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नुकत्याच तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे मोबाइल अ‍ॅपद्वारे भरण्यात आलेली ऑनलाइन कर बिलाची भरणी ही रोख भरणीपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे कामकाज अत्याधुनिक आणि सुरळीत पद्धतीने चालावे याकरिता ‘माय एमबीएमसी‘ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या ‘माय एमबीएमसी’ मोबाइल अपद्वारे नागरिकांना मालमत्ता कर तपशील पाहणे व मालमत्ता कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच यात पाणीपट्टी आणि करपट्टी भरणासाठी  फोन-पे, गुगल-पे, व अन्य माध्यमातून पैसे भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसात या ‘अ‍ॅप’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या २० दिवसात ‘अ‍ॅप’ व ‘पोर्टल’द्वारे महानगरपालिकेला ३८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर प्रत्यक्षात हा आकडा पालिकेला प्राप्त होणाऱ्या रोख भरणीपेक्षा देखील अधिक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कर उत्पन्न रखडल्यामुळे झालेल्या अर्थसंकल्पवरील परिणाम मोबाइल ‘अ‍ॅप’च्या मदतीने कमी होईल असा विश्वास संगणक व सामान्य प्रशासन विभाग प्रमुख राजकुमार घरत यांनी व्यक्त केला.

‘अ‍ॅप’मुळे मीरा-भाईंदर शहराबाहेर राहत असलेल्या तसेच करभरणीला कंटाळा करत असलेल्या नागरिकांना घरबसल्या देयक भरणे शक्य होत असल्यामुळे कर उत्पन्नात वाढ होत आहे.

– सुदाम गोडसे, उपायुक्त, कर निर्धारक आणि संकलन विभाग