कोटय़वधी रुपयांचा निधी कर्जरूपात मिळवूनदेखील कल्याण-डोंबिवलीतील विकासकामे रखडत असल्याची दखल मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)आता घेतली आहे. केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीचा वापर करून शहरातील किती विकासकामे पूर्ण केली, याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे पत्र एमएमआरडीएने कल्याण-डोंबिवली महापालिकेस पाठवले आहे. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली नुसती रेटारेटी करणाऱ्या महापालिकेला आता ठोस कामे दाखवावी लागणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विकास कामे ९८ टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा मध्यंतरी महापालिकेकडून करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर आता महापालिका एमएमआरडीएकडे किती कामाचा तपशील देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महापालिका हद्दीत जलवाहिन्या तसेच जुन्या गंजलेल्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेस दिले आहे. या कामांच्या निविदांचे दर वाढवून देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही कामे रखडल्याने एमएमआरडीएकडून मिळणारा निधी गोठवण्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू झाल्या होत्या. मात्र, त्या वेळी शहरांतील ९८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करीत पालिकेने त्या वेळी आपली सुटका करून घेतली होती.
कल्याणमधील एक जागरूक नागरिक राजेंद्र रहाळकर यांनी आता हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. महापालिकेने एमएमआरडीएला चुकीची माहिती दिली असल्याची तक्रार रहाळकर यांनी एमएमआरडीए आणि राज्य सरकारकडे केली आहे.
याची दखल घेत एमएमआरडीएने आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा अहवाल कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मागवला आहे. शहरातील जलवाहिन्या तसेच मलवाहिन्या बदलण्याची कामांची सद्यस्थिती काय याचा अहवालही सादर केला जावा, असे पत्र नगरविकास विभागाने महापालिकेस पाठविले आहे.

मुदतवाढ मागितली आहे
दर महिन्याच्या विकासकामांचा लेखाजोखा प्राधिकरणाला कळवण्यात येतो. मात्र, शहरातील भूमिगत जलवाहिन्या आणि मलवाहिन्या टाकण्याच्या कामांचा सद्य:स्थिती अहवाल आमच्याकडे मागवण्यात आला आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शहरातील ९८ टक्के विकासकामे पूर्ण झाली आहेत. मात्र, दिलेली मुदत टळून गेली आहे, हीदेखील वस्तुस्थिती आहे. यासाठी आम्ही आधीच प्राधिकरणाकडे मुदतवाढ मागितली आहे. त्याबरोबरच सध्या शिल्लक असलेली रेल्वे प्रशासनाकडील कामे परवानगी मिळाल्यावर लवकरच पूर्ण केली जातील.
– प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, कडोंमपा