भिवंडीलगत अभयारण्य, साहसी क्रीडा केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा निर्णय
वडाळा ते घोडबंदर मार्गावर मेट्रोची पायाभरणी करून ठाणेकरांना सुकर प्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता ठाण्याच्या आसपासच्या भागाच्या विकासाकडे मोर्चा वळवला आहे. ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांच्या मध्ये येणाऱ्या नव्या ठाण्याच्या पट्टय़ात येत्या वर्षभरात ७०० कोटींपेक्षा अधिक खर्चाचे विकास प्रकल्प राबवण्याचे प्राधिकरणाने निश्चित केले आहे. त्याअंतर्गत या परिसरात भव्य लॉजिस्टिक हब तसेच ट्रान्स्पोर्टेशन हब विकसित करण्यात येणार आहे. याखेरीज महाराष्ट्रातील तुंगारेश्वर अभयारण्याच्या धर्तीवर खारबावलगतच्या कामन पट्टय़ात नवीन अभयारण्य विकसित करण्यात येणार असून या भागात साहसी क्रीडा उद्यान (अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स पार्क) उभे करण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे तसेच आसपासच्या परिसराला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली गेल्याची ओरड काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सातत्याने होत असे. मात्र, गेल्या दीड-दोन वर्षांत हे चित्र बदलू लागले असून प्राधिकरणाने यंदाच्या आर्थिक वर्षांत ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ८५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी मोठी रक्कम भिवंडी आणि त्याभोवतालच्या भागाच्या विकासावर खर्च करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.
भिवंडी महापालिकेच्या आर्थिक मर्यादा आणि ठाणे महापालिकेच्या विस्तारास असलेली बंधने लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी आणि ठाण्याच्या मध्यभागी येणाऱ्या परिसरात नव्या ठाण्याची उभारणी करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. महानगर प्राधिकरणाने यापूर्वीच खारबाव परिसरात नवे उद्योग केंद्र विकसित करण्याची घोषणा केली आहे. हे करत असताना या संपूर्ण परिसरात उद्योगांसोबत दळणवळणाच्या सुविधांचे पाठबळ मिळवून देण्याचा प्रयत्न येत्या वर्षांत केला जाणार असून ट्रान्सपोर्टेशन हब हा याच नियोजनाचा एक भाग असल्याचा दावा एमएमआरडीएमधील वरिष्ठ सूत्रांनी केला. बेकायदा गोदामांमुळे बदनाम झालेल्या या परिसरात नियोजित असे लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसची संकल्पना या भागात रुजवली जाणार आहे.
कर्जत तसेच खोपोली परिसरातील काही खासगी उद्योगांनी उभारलेल्या अ‍ॅम्युझमेंट तसेच वॉटर पार्कला मिळत असलेला तुफान प्रतिसाद लक्षात घेता हे स्पोर्टस पार्क मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना आकर्षित करेल, अशी योजना आहे. खारबावलगत असलेल्या कामण भागात अभयारण्य विकसित केले जाणार असून ते संजय गांधी अभयारण्याशी जोडणार आहे. या प्रकल्पांमुळे येथील उद्योगांना व पर्यटन व्यवसायालाही तेजी मिळेल, असे सूत्रांनी म्हटले.