29 November 2020

News Flash

रेल्वे स्थानके असुरक्षितच!

रेल्वे सुरक्षा बल (आरएसपी) आणि रेल्वे पोलिसांचीही गस्त नियमितपणे होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

तपासणी यंत्रे, धातूशोधक यंत्रणा धूळ खात; आरपीएफ, पोलिसांची गस्तही अनियमित

किशोर कोकणे, आशिष धनगर

ठाणे :  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील रेल्वे स्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, ठाणे पट्टय़ातील बहुतांश रेल्वे स्थानके सुरक्षेच्या बाबतीत ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. या रेल्वेस्थानकांत बसवण्यात आलेली धातूशोधक यंत्रे आणि सामान तपासणी यंत्रे धूळ खात पडून राहिली आहेत. रेल्वे सुरक्षा बल (आरएसपी) आणि रेल्वे पोलिसांचीही गस्त नियमितपणे होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांत धातूशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) आणि सामान तपासणी यंत्रे (बॅगेज स्कॅनर) बसवण्यात आली. या यंत्रांच्या देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकॉम यंत्रणा विभागाकडे असते. सुरुवातीच्या काळात या यंत्रांचा व्यवस्थित वापर होत होता. परंतु, मुंबई हल्ल्याच्या झळा कमी झाल्यानंतर ही यंत्रे वापराविना धूळखात पडू लागली आहेत. या यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने आता ठाणे स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) पत्र पाठवून ही यंत्रे तातडीने दुरुस्त करण्याची तसेच ठाणे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

कल्याण, डोंबिवलीतही दुर्लक्ष

मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकात पश्चिमेकडे एक सामान तपासणी यंत्र व दोन मेटल डिटेक्टर दरवाजे आहेत. पूर्वेकडे एक सामान तपासणी यंत्र व तीन मेटल डिटेक्टर दरवाजे आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणची सामान तपासणी यंत्रे बंद आहेत. या यंत्रांजवळ तैनात करण्यात आलेले आरपीएफ कर्मचारी प्रवाशांचे सामान कधीच तपासत नाहीत. डोंबिवली रेल्वे स्थानकात तर अशी यंत्रेच नसल्याने प्रवाशांची तपासणीच होत नाही.

प्रवासी कोट

मध्य रेल्वे स्थानकांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. कुल्र्याच्या लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकांत प्रवाशांची तपासणी होते. मात्र ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नाही. या रेल्वे स्थानकांवर असलेली लाखो रुपयांचे बॅग स्कॅनर यंत्रे धूळ खात पडून आहेत. रेल्वे प्रशासनाने या स्थानकांवरही सुरक्षा व्यवस्था चोख करायला हवी. -सुमेध मोहिते, रेल्वे प्रवाशी

मशीनचा वापर होत नसेल तर त्याची नेमकी कारणे शोधून तसेच आरपीएफला यासंबंधीची माहिती देऊन त्याचा वापर सुरू करण्यात येईल.

– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

पश्चिमेचे दरवाजे खुले

ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडून जवळपास ७० टक्के प्रवासी दररोज ये-जा करत असतात. असे असतानाही स्थानकाच्या पूर्वेकडील द्वारावर मेटल डिटेक्टर आणि सामान तपासणी यंत्रे बसवण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीचे बहुतांश प्रवासी पूर्वेकडून स्थानकात प्रवेश करत असल्याने त्यांच्या तपासणीसाठी ही यंत्रे तेथे बसवल्याचा आरपीएफचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्षात या यंत्रांचा वापरच होत नसल्याचे आमच्या प्रतिनिधींना दिसून आले. या यंत्रांच्या शेजारी रेल्वे पोलीस बलाचा एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रवासीही स्थानकात थेट प्रवेश करतात.

स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांच्या मागण्या

* ठाणे स्थानकातील प्रतीक्षागृहाला खिडक्या बसवा.

*  एसटी आगाराच्या अलीकडे असलेल्या मुख्य तिकीट घराजवळ मेटल डिटेक्टर बसवा.

*  कल्याणच्या दिशेला असलेला स्थानकातील प्रवेशाचा चोर मार्ग बंद करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 2:27 am

Web Title: most of the railway stations in the thane belt are unsafe
Next Stories
1 डॉक्टर दाम्पत्याची कोटय़वधींची फसवणूक
2 मेट्रोसाठी घोडबंदरमध्ये वाहतूक बदल
3 योजनांची रखडपट्टी
Just Now!
X