ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ विभागांतील घराघरांत पाइप गॅस; २५५ किलोमीटर परिघात विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू

गॅस सिलिंडरची ने-आण करण्यातील दगदग आणि त्याचे वाढते दर याला पर्याय असलेली वाहिनीद्वारे गॅसपुरवठय़ाची योजना आता ठाणे जिल्ह्य़ात आणखी विस्तारणार आहे. डोंबिवली ते अंबरनाथ या शहरांतील सुमारे २७ हजार ग्राहकांपर्यंत पाइपद्वारे पोहोचत असलेला गॅस आता उर्वरित कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी महानगर गॅस कंपनीने तयारी सुरू केली आहे. येत्या काळात या शहरांतील २५५ किलोमीटर परिघात गॅस वाहिन्यांचा विस्तार करण्यासाठी कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील नैसर्गिक गॅस वाहिन्यांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगर गॅसने घेतला आहे. ठाण्यातील नौपाडा, ब्राह्मण सोसायटी, विष्णू नगर, माजीवाडा, वाघबिळसारख्या परिसरांत सध्या २९ किलोमीटर स्टील, ४२२ किलोमीटर पॉलिथेलीन पाइप, १ लाख १० हजार घरगुती गॅस, २११ वाणिज्य आणि पाच औद्योगिक गॅस ग्राहकांचे जाळे पसरले आहे. येत्या काळात कळवा, खारेगाव, पारसिक नगर, बुधाजी नगर, कोपरी, घोडबंदर, गायमुख या परिसरांत नसर्गिक गॅस वाहिन्यांचा विस्तार होणार आहे.

डोंबिवली ते अंबरनाथ या पट्टय़ात १४ हजार ७०० घरगुती, ३० वाणिज्य आणि ११ औद्योगिक व्यावसायिक संस्था महानगर गॅसच्या वाहिनी सुविधेचा सध्या लाभ घेत आहेत.

२०११ पासून महानगर गॅसने अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा आणि डोंबिवली परिसरात स्टील ट्रक पाइपलाइन आणि पॉलिथेलीन पाइपलाइनद्वारे नैसर्गिक गॅसपुरवठा करण्यासाठी जाळे उभारण्याचे काम सुरू केले आहे.

आतापर्यंत अंबरनाथ ते कल्याण भागात ५५ किलोमीटरच्या पट्टय़ात पाइपलाइनद्वारे नैसर्गिक गॅसपुरवठा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भागात येत्या काळात १५ हजार कुटुंबाना नैसर्गिक गॅसपुरवठा करण्यासाठी वाहिन्यांचे जाळे विस्तारण्यात येणार आहे, असे महानगर गॅसच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मिश्र वस्ती, उंच-सखल भाग

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरांतील चार लाख रहिवासी चाळी, इमारती आणि बंगले अशा मिश्र वस्तीत राहतात. अंबरनाथ येथील औद्योगिक वसाहत, बदलापूर येथील कात्रप आणि आपटेवाडी, कल्याण पूर्वेतील वालधुनी, लोकग्राम, विजयनगर आणि डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीत प्रामुख्याने नैसर्गिक गॅस वाहिन्यांचा विस्तार होणार असल्याचे महानगर गॅसच्या (मुंबई विभाग) वतीने कळविण्यात आले. या परिसरातील काही घरे उंच-सखल भागांत आहेत. अशा भागांत गॅस वाहिन्या टाकणे जिकिरीचे आहे. मात्र  तरीही पाइप गॅसचे जाळे विस्तारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.