tvlog02ठाणे शहरातील सहयोग मंदिरात अत्यंत दर्जेदार संगीताचे व इतर कार्यक्रम होत असतात, शिवाय विविध प्रशिक्षणाचे वर्गही आयोजित केले जातात. नादब्रह्म, घंटाळी मित्र मंडळ व इतर अनेक संस्था आणि कलाकार या सभागृहात आपले कार्यक्रम सादर करत असतात. मात्र या भागामध्ये वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी मर्यादित जागा असल्याने आणि ती जागाही भरून गेलेली असल्याने वाहने कुठे उभी करावीत, हा प्रश्न पडतो. या भागामध्ये कार्यक्रमांसाठी येणाऱ्या रसिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या अडचणी बऱ्याच अंशी कमी होऊ शकतील.
सहयोग मंदिर मार्ग हा अत्यंत अरुंद रस्ता आहे आणि त्यावर नेहमीच वाहने उभी केलेली असतात. सहयोग मंदिरातील कार्यक्रमांना येणाऱ्या कलाकारांना व रसिक प्रेक्षकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. बऱ्याचदा त्यासाठी जागाच शिल्लक नसते.

बदलापूर रेल्वे स्थानक परिसर खड्डेमय
भावेश नलावडे, बदलापूर
बदलापूर पूर्वेला तिकीट घराबाहेरील रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालवताना नागरिकांना त्रास होत आहे. पूर्वेला तेलवणे टॉवर येथून रेल्वे स्थानकाकडे येताना रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तिकीट घरापासून पुढील रस्ता हा रेल्वे हद्दीत येत असल्याने त्यांचे नुकतेच नूतनीकरण झाले असून हा रस्ता सिमेंट क्राँकीटपासून बनला आहे. परंतु त्याच्या अधीचा नगर परिषदेच्या हद्दीतील रस्त्याची मात्र दुरवस्था आहे. हा संपूर्ण रस्त खड्डेमय झाला आहे.
खड्डेमय रस्त्यांचा दुचाकीस्वारांना दुचाकी चालविताना त्रास होतोच; परंतु सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या रेल्वे प्रवाशांनाही याचा फटका बसतो. संबंधित प्रश्नामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते आहे. त्याचप्रमाणे खड्डय़ातून जाताना वाहने हळू चालवावी लागत असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. तसेच या परिसरातील रस्त्यावर काही मासळी विक्रेतेही बसतात. पावसाळ्यात येथील खड्डय़ांची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

पदपथावरील दुकानांमुळे वाहतूक कोंडी..
विनायक अत्रे, ठाणे</strong>
ठाण्यातील नौपाडा विभागातील भगवती विद्यालयाजवळ स्वामी समर्थ चौक आहे. या चौकामध्ये एक वडापावचे दुकान असून तेथील फुटपाथवर कायम ग्राहकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे फुटपाथच्या लगतच चार चाकी गाडय़ा आणि रिक्षा यासारखी वाहने उभी असतात. तसेच समोरील रस्त्यावरही अशाच प्रकारची वाहने उभी केली जातात. या परिसरात टपाल पेटीसुद्धा आहे. टपाल पेटीशेजारीच असणाऱ्या फुटपाथवर अपंगांसाठी असणारे एक दुकान उभारण्यात आले आहे. भाजीवाले, किरकोळ विक्रेते आदी व्यावसायिक या परिसरात आपला व्यापार करीत असतात.
पदपथावरील झालेल्या या अतिक्रमणामुळे भगवती विद्यालयाचे विद्यार्थी, पालक, वृद्ध मंडळी या परिसरातून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतात.