दिवाळीच्या खरेदीसाठीच्या गर्दीमुळे शहरात वाहतुकीची समस्या यंदा वाहतूक बदल न करण्याचा पोलिसांचा निर्णय

दिवाळी जवळ येताच ठाण्यातील गोखले मार्ग, मुख्य बाजारपेठ तसेच राम मारुती मार्गावर खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. त्यामुळे नौपाडा तसेच रेल्वे स्थानक परिसरात अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी टाळता यावी यासाठी दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे बदल केले जातात. मात्र, या बदलांचेही विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात आल्याने यंदाच्या वर्षी गोखले, राम मारुती मार्ग, जांभळी नाका या परिसरांत कोणतेही वाहतूक बदल न करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. अर्थात वाहतुकीच्या नियंत्रणासाठी या भागांमध्ये दुप्पट संख्येने वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असल्याने वाहतुकीला शिस्त येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोखले मार्ग, राम मारुती रोड आणि जांभळीनाका परिसर ठाणे शहराचे व्यावसायिक केंद्र मानले जाते. ही सर्व ठिकाणे अरुंद रस्त्यांची असून कडेलाच दुकाने आहेत. मुख्य बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दुकाने तसेच फेरीवाले विविध साहित्यांची विक्री करतात. त्यामुळे सणांच्या काळात या भागांत खरेदीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने येत असतात. दिवाळीच्या काळात हा आकडा बराच मोठा असतो त्यामुळे या परिसरात बिकट वाहतूक कोंडी होते.
या कोंडीवर उतारा शोधण्यासाठी दोन ते तीन वर्षांपासून वाहतूक पोलिसांकडून या भागातील वाहतूक मार्गात बदल केले गेले. या बदलांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत असल्याने कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदा दिवाळी खरेदीसाठी वाहतूक मार्गात कोणतेही बदल करायचे नाहीत, असा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या भागातील पार्किंग व्यवस्थाही नेहमीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येणार आहे. कोंडी टाळण्यासाठी या भागातील पोलीस बळ वाढविले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या मॉलमध्ये दिवाळी सणानिमित्ताने मोठय़ा सवलती ठेवण्यात येतात. यामुळे खरेदीसाठी मॉलमध्ये नागरिकांची झुंबड उडत असल्याने मॉलच्या परिसरात कोंडी होत असते. या पाश्र्वभूमीवर मॉल व्यवस्थापनासोबत वाहतूक पोलिसांनी एक बैठक बोलाविली असून त्यामध्ये मॉल परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल..
ठाणे तलावपाळी परिसरात, राम मारुती रोड तसेच पाचपाखाडी भागातील ओपन हाऊस परिसरात येत्या १० नोव्हेंबरला दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने या भागातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून हे बदल सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राम मारुती रोड, तलावपाळी परिसरात तसेच ओपन हाऊस भागाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. तसेच दिवाळीच्या कालावधीत गोखले मार्गावर चार दिवस वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.