25 February 2020

News Flash

बंदिवानांनाही आता उच्च शिक्षणाची संधी

कारागृहात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र चालविले जाते.

शिक्षण ही एक अखंड सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्या अर्थाने नवे ज्ञान मिळवू इच्छिणारी प्रत्येक व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते. शिक्षणाच्या या मूलभूत हक्कापासून कारागृहातील बंदिवानही अपवाद नाहीत. आयुष्यातील एखाद्या वळणावर हातून गुन्हा घडल्याने शिक्षेस पात्र ठरलेले अनेक बंदिवान दूरस्त अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण पूर्ण करीत असतात. ठाणे कारागृहातील सात कैद्यांनी यंदा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत पदवी परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे आता लवकरच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे परीक्षा देण्याची सोय उपलब्ध होऊन बंदिवान विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणही घेऊ शकणार आहेत.

शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य कारागृह विभागाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी विनामूल्य शिक्षणाची सोय केली आहे. त्यानुसार कारागृहात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र चालविले जाते. या अभ्यासकेंद्रामार्फत ठाण्यातील ६५ कैद्यांनी कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदविला आहे. मात्र पदवी मिळाल्यानंतर कलाशाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी यशवंतराव विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय नाही. त्यामुळे आता ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये पदवीधर कैद्यांच्या पुढील शिक्षणासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी हिरालाल जाधव यांनी दिली. त्यांनी विद्यापीठाकडे केंद्र सुरू करण्याचे निवेदन पाठविले असून येत्या काही दिवसांमध्ये विद्यापीठाचे पथक कारागृहामध्ये येऊन पाहणी करतील आणि त्यानंतर केंद्राला परवानगी देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सामाजिक व राज्यशास्त्राकडे कैद्यांचा कल

कैद्यांना कला आणि वाणिज्य विषयात पदवी घेण्याची सोय करण्यात आली आहे. प्रामुख्याने सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र आणि मराठी या विषयांत पदवी घेण्याकडे कैद्यांचा अधिक कल आहे. त्यानंतर भाषा विषय कैद्यांकडून घेतले जातात. कारागृहात प्रात्यक्षिकांचे विषय शिकवले जात नाहीत, असे मुतकुळे यांनी सांगितले.

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत कैद्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित केले जातात. त्यासाठी कैद्यांना पुस्तकेही  पुरवली जातात.
  • विद्यापीठ सर्व अभ्यासवर्गाची आखणी करून वेळापत्रक पाठविते. त्यानुसारच कारागृह कैद्यांचे वर्ग घेतले जातात.
  • कधी-कधी उच्चशिक्षित कैद्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले जाते. वर्षांतून एकदा कारागृहात परीक्षा घेतली जाते.

सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये प्रथम वर्षांला ५५ विद्यार्थी शिकत आहेत, तर द्वितीय वर्षांला दहा जणांनी प्रवेश घेतला आहे. याबाबत कारागृहातील शिक्षकांना विचारणा केली असता ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये कच्च्या कैद्यांची शिक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीचा फरक दिसून येतो.

– प्रा. गणेश मुतकुळे, ठाणे कारगृह.

First Published on June 11, 2016 2:11 am

Web Title: now prisoner also take higher education
Next Stories
1 संशयित दोषींवर वरदहस्त कोणाचा?
2 सुक्या कचऱ्यातील थर्माकोलचा फेरवापर
3 खाडीकिनारी पावसाळ्यानंतर कारवाई
Just Now!
X