ठाण्यात झोपडपट्टी भागात ऑफलाइन लसीकरण; ज्येष्ठ नागरिकांसाठी गाडीत लस देण्याचा निर्णय

ठाणे : महापालिका क्षेत्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सकाळी ९ आणि सायंकाळी ५ अशा दोन वेळा निश्चित करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेने घेतला आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली असली तरी काही झोपडपट्टी भागांमध्ये ऑफलाइन लसीकरण करण्याचा तसेच मुंबईच्या धर्तीवर खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून गृहसंकुलांत लसीकरण करण्याबाबतचे धोरण आखण्याचाही निर्णय घेतला आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून तिथे ऑनलाइनद्वारे पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस देण्यात येत आहे; परंतु ऑनलाइन नोंदणीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे नागरिकांना दिवसभर नोंदणीची प्रतीक्षा करावी लागत होती.या पाश्र्वभूमीवर शहरातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती.  ठाणे शहरात ज्या प्रमाणात लशी उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ या गटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी सक्तीची असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची वेळ सकाळी ९ आणि सायंकाळी ५ अशी निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

वाढीव केंद्रांबाबत नियोजन

४५ आणि त्यापुढील नागरिकांनाही पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे; परंतु झोपडपट्टी विभागातील नागरिकांसाठी काही केंद्रांवर ऑफलाइन लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कमीत कमी कालावधीमध्ये सर्व नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक असून त्यासाठी आगामी काळात लशींच्या उपलब्धतेनुसार वाढीव केंद्रांबाबतही नियोजन करण्याची प्रशासनाने कार्यवाही करावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.