अंबरनाथ, बदलापुरात दिवसाला अवघ्या ५० ते ८० चाचण्या

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असली तरी शहरात होणाऱ्या एकूण चाचण्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प असल्याचे धक्कादायक चित्र पुढे येत आहे. अंबरनाथमध्ये खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने ५० तर शासकीय ३० अशा एकूण ८० चाचण्या केल्या जात आहेत, तर बदलापुरात अवघ्या ५० चाचण्या प्रतिदिन घेतल्या जात आहेत. यापैकी बऱ्याच चाचण्यांचे निदान मुंबईतून होण्यास वेळ लागत आहे. या शहरांतील अनेक नागरिक मुंबई, ठाण्यात जाऊन तेथील खासगी केंद्रातून चाचणी करून घेत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील करोना संसर्गाचे प्रमाण काही अंशी घटले असले तरी रुग्णवाढीचा दर आता ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांकडे वळला आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये झपाटय़ाने रुग्ण वाढत आहेत. असे असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत या शहरांमध्ये चाचण्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे प्रत्यक्षात परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याची भीती व्यक्त होत आहे. अंबरनाथ शहरात २,७७४ आणि बदलापूर शहरात १,५२४ रुग्ण आढळून आले आहेत. बदलापूर शहरात दरदिवसाला ३० ते ५० संशयितांचे नमुने घेतले जातात, तर अंबरनाथमध्ये पालिकेतर्फे अवघे ३० जणांचे नमुने गोळा केले जातात. अंबरनाथ नगरपालिका खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने आणखी ५० चाचण्या करत असते. त्यामुळे शहरात दिवसाला ८० चाचण्या होतात. मात्र शहरांची लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता चाचण्या अगदीच मर्यादित असल्याने संसर्गाचा

नेमका आवाका अद्याप स्पष्ट होऊ  शकलेला नाही. त्यातही दोन्ही शहरांत दररोज पालिकेतर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या एकूण रुग्णसंख्येच्या ४० ते ६० टक्के रुग्ण होकारात्मक आल्यानंतरच त्यांची माहिती पालिका प्रशासनाला मिळत असते. त्यातील काही जण खासगी चाचणी करत असतात.

चाचण्यांची संख्या का घटली?

अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील करोना चाचणी नमुने मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवले जातात. यापूर्वी दोन्ही शहरांमधून दररोज किमान शंभर चाचण्यांचे नमुने पाठवले जात होते. कालांतराने जेजे रुग्णालयावर इतर शहरांच्या चाचण्यांचा भार वाढल्याने त्यांच्याकडून अधिकच्या चाचण्यांचे नमुने घेण्यास नकार दिला जात होता. सध्या अंबरनाथ नगरपालिकेचे ३० तर बदलापूर नगरपालिकेतील ५० नमुने तपासले जात आहेत. त्यामुळे दिवसाला दोन्ही शहरांतून अवघ्या १२० ते १५० चाचण्या केल्या जात आहेत.

रुग्णांच्या संयमाची परीक्षा

आरोग्यमंत्र्यांच्या बदलापूर दौऱ्यानंतर दोन्ही नगरपालिकांनी विलगीकरणाची क्षमता वाढवून रुग्णामागे १० ते १५ संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यास सुरुवात केली. चाचण्या मात्र दिवसाला ३० ते ५० इतक्याच होत असल्याने अनेक रुग्णांना पाच ते सात दिवस विलगीकरण कक्षात काढावे लागतात. दोन ते तीन दिवस अहवाल येण्यासाठी लागतो. जर रुग्ण बाधित असेल तर पुढे आणखी १० ते १५ दिवस रुग्णांना ठेवले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांचा मुक्काम किमान ७ ते ८ तर कमाल १५ ते २० दिवसांचा होतो. त्यामुळे रुग्णांचा संयम सुटत आहे. या शहरांमध्ये चाचणी केंद्र सुरू केल्यानंतर संख्याही वाढेल, असा विश्वास नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला.