बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जात असल्या तरी बनावट नोटांची तस्करी बिनबोभाट सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमध्ये बनावट नोटा पोहोचवण्यासाठी सीमेजवळील राज्यांतून या शहरांत येणाऱ्या मजुरांना हाताशी धरले जात आहे. ठाणे पोलिसांनी अलीकडेच केलेल्या एका कारवाईत अशा दोन मजुरांना अटक केली आहे. २० हजार रुपयांना एक लाख रुपयांच्या बनावट नोटा या दराने सुमारे पाच लाख रुपयांच्या नोटा या मजुरांनी ठाण्यात आणल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.

ठाणे येथील कळवा भागात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या अब्दुल हलीम अब्दुल जब्बार शेख (३२) आणि शाहीर शमशुल मोमीन (२४) यांना खंडणीविरोधी पथकाने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर अटक केली. त्यांच्याजवळून तीन लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत हे दोघेही मुंबईत मजुरीचे काम करण्यासाठी आल्याचे उघड झाले. हे दोघेही मूळचे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्हय़ातील पियारपूर गावचे रहिवासी असून जास्त पैशांच्या आमिषाने त्यांनी हे काम केल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशमार्गे झारखंड येथे बनावट नोटांची आयात केली जात असून तेथून मुंबईसारख्या शहरांत रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांमार्फत त्या बाजारात पसरवल्या जात असल्याचे चौकशीत समोर आले. या दोघांपैकी अब्दुल याने याआधीही दोनदा अशा प्रकारे नोटांची तस्करी केल्याचे कबूल केले आहे. २० हजार रुपयांच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत असल्याचे अब्दुलने पोलिसांना सांगितले.

मुख्य टोळीचा शोध : अब्दुल आणि शाहीर या दोघांकडे सुमारे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा होत्या. मात्र, त्यापैकी त्यांच्याकडून पावणेतीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांना असून त्या कुठे वितरित करण्यात आल्या, याचा आता शोध सुरू आहे. या दोघांसोबत अन्य काही मजूर या तस्करीत सहभागी आहेत का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.