पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने एक्स्प्रेसचे इंजिन फक्त तीन डब्यांना घेऊन काही अंतर पुढे धावल्याची घटना गुरुवारी सकाळी कल्याणमधील पत्री पुलाजवळ घडली. उर्वरित डबे मागेच राहिल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक देखील विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे.
गुरुवारी सकाळी मनमाडवरुन मुंबईला येणारी पंचवटी एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून ठाण्याच्या दिशेने निघाली. कल्याण स्थानक सोडल्यानंतर पत्री पुलाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले आणि तीन डब्यांसह इंजिन काही अंतर पुढे गेले. तर उर्वरित डबे मागेच राहिले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या बिघाडाचा फटका लोकल गाड्यांनाही बसला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पत्री पुलाजवल लोकल गाड्यांचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरुन चालतच कल्याण किंवा ठाकूर्ली स्टेशन गाठले. सकाळी गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2019 10:33 am