कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले. आजपासूनच पत्रीपुलावरील वाहतूक सुरू होणार आहे. हा पूल सुरू झाल्यास कल्याण शिळफाटा मार्गावर तसेच कल्याण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कल्याणकर पत्रीपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून त्रस्त होते. या प्रकल्पासाठी आतापर्यंत ३४ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पत्रीपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळेस भाषण करताना श्रीकांत शिंदे यांनी पत्रपुलाचे नामकरण करण्याची इच्छा बोलून दाखवली.
श्रीकांत शिंदे यांनी आज आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे हे खरोखरच ऐतिहासिक आहे. आधीचा पत्रीपुल हा १०४ वर्ष जुना होता आणि आज ज्याचं उद्घाटन झालं आहे तो १०० वर्षांपर्यंत टीकेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. आपल्या या पुलाचं नाव ग्रामदेवता असणाऱ्या श्री तिसाई आई देवीच्या नावावर आहे. त्यामुळेच जर नामकरण होत असेल तर टेक्निकली या पुलाला इतर दुसरं कोणतं नाव देता येणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे आजपासून आपण हा पत्रीपुल बोलणं बंद करुन आजपासून याला आपण आई तिसाई देवी उड्डाणपूल बोलण्यास आपण सर्वांनी सुरुवात केली पाहिजे, असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं.
कल्याण येथील पत्रीपुलाचे उद्घाटन- LIVE https://t.co/IQL3vvnGqM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 25, 2021
हा पूल बांधण्यासाठी उशीर झाल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि एकंदरित करोनामुळे लागलेल्या ब्रेक या सर्वांचा विचार करता हे बांधकाम आणि आजचा उद्घाटन सोहळा वेळेतच झाल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
अत्यंत महत्वाचा पूल…
कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिले होते. त्यानंतर अनेक कारणांमुळे काम रेंगाळले. या कालावधीत एकाच पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने पत्रीपूल वाहतूक कोंडीचे केंद्र झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी केली. पत्रीपूल प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ३४ कोटी रुपये खर्च आला आहे. पूल सुरू होणार असल्याने कल्याणमधील वालधुनी, सुभाष चौक, गजानन चौक, रामबाग, कल्याण रेल्वे स्थानक, कोळसेवाडी, नेतीवली, ९० फूट रस्ता या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.