लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  ई- लोकार्पण पार पडले. या प्रसंगी आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारून मीरा-भाईंदर सह वसई विरार मधील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आश्वासन  दिले.

मीरा-भाईंदर, वसई-विरारकरीता पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून १ ऑक्टोबर पासून या पोलीस आयुक्तालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबतचा अध्यादेश गृह विभागाने जारी केला होता. या आयुक्तालयाकरीता मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिकेची राम नगर येथील तीन मजली इमारत वार्षिक २७ लाख रूपये इतक्या भाडेतत्वावर दिली आहे.  लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते.

मीरा-भाईंदर सह वसई-विरार शहराच्या जनगणनेनुसार ४४ लाख ६६ हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे. या आयुक्तालय अंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये काशीगाव व खारीगाव तर वसई-विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळींज आणि नायगाव अश्या नव्या सात पोलीस स्टेशनचा अंतर्भाव राहणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये सध्या काशिमीरा, मीरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर व उत्तन सागरी तर वसई-विरारमध्ये वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा व तुळींज अशी एकूण १३ पोलीस ठाणी अस्तित्वात आहेत. आयुक्तालयासाठी एकूण २४८८ पद निर्मितीला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.