सक्तवसुली संचालनालयाशी ठाणे पोलिसांचा संपर्क ’ आरोपी नगरसेवकांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी सक्तवसुली संचालनालयाशी (ईडी) संपर्क साधला असून, हवाला व्यवहाराशी हे प्रकरण जोडले गेले आहे का, या दिशेनेही तपासाचे चक्र फिरू लागले आहे. परमार यांनी डायरीत नोंदवून ठेवलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या सविस्तर नोंदी प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून मिळविण्यात पोलिसांना यापूर्वीच यश आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने परमार यांची काही महिन्यांपूर्वी चौकशी केली होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. या माहितीची खातरजमा करून घेतली जात असून, त्यासाठी सक्तवसुली संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी संपर्क साधल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाने परमार यांनी आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवलेली डायरी जप्त केली होती. त्याआधारे ठाण्यातील काही बडे राजकीय नेते चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या नावांच्या नोंदीपुढे ‘निवडणूक निधी’ असा उल्लेख असून पाच ते दहा लाखांची रोकड दिल्याचा उल्लेख आहे. यासंबंधीचे वृत्त शनिवारी प्रसिद्ध होताच ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विविध अंगाने तपास केला जात आहे.
ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या छाप्यापाठोपाठ सक्तवसुली संचालनालयानेही परमार यांची आर्थिक व्यवहारासंबंधी चौकशी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या चौकशीचे धागेदोरे हवाला प्रकरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून परमार यांची चौकशी झाली होती का, या माहितीची खातरजमा केली जात आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सक्तवसुली संचालनालयाच्या पश्चिम विभागीय प्रमुखांकडे यासंबंधीची विचारणा करण्यात आली आहे. चौकशी झाली असल्यास ती कोणत्या प्रकरणाशी संबंधित होती यासंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्नही सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी शनिवारी मुंबई येथील न्यायालयात काँग्रेस नगरसेवक हनुमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण व राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना हजर करण्यात आले होते.