ठाणे शहरात विविध संस्था, समूह आणि वसाहती पर्यावरणस्नेही उपक्रम राबवीत आहेत. कचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलसंचय, सौर ऊर्जा आदींचा अवलंब अनेक जण करीत आहेत. स्वयंस्फूर्ती राबबिण्यात येणाऱ्या या उपक्रमांना शासकीय यंत्रणेने प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. शहरातील प्रकृती तसेच मित्तल पार्कवासीयांचाही हाच अनुभव आहे. येथील रहिवाशांना पर्यावरणस्नेही कचरा निर्मूलन प्रकल्प राबविला, पण प्रशासनाकडून प्रोत्साहन मिळालेले नाही..

प्रकृती, मित्तल पार्क, रघुनाथनगर, तीनहाथ नाकाजवळ, ठाणे (प.)

महानगराचे स्वरूप प्राप्त झालेल्या ठाणे शहर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांची भाऊगर्दी, वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचे पदपथावर होणारे अतिक्रमण, गोंगाट असे चित्र असते. फार थोडी ठिकाणी अशी आहेत, जिथे हवीहवीशी वाटणारी निरव शांतता असते. तीनहात नाका येथील प्रकृती निवासी संकुल त्यापैकी एक. अगदी नावाप्रमाणे रहिवाशांच्या प्रकृतीस पोषक असे वातावरण या ठिकाणी आहे. रघुनाथनगर येथील प्रकृती निवासी संकुल १६ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. के. के. मिल कंपनीच्या जागेवर ही इमारत उभी राहिली. त्यानंतर मित्तल पार्क तयार झाले. रेल्वे स्थानकापासून १५ ते २० मिनिटांत अगदी आरामात पायी चालत येथे येता येते. तळमजला अधिक ७ अशा दोन विंगमध्ये ५६ सदनिका आहेत. वन बीचके, टू आणि थ्री बीचकेमध्ये राहणारे रहिवासी हे विविध भाषिक समाजातील आहेत, असे असतानाही कोणताही वाद, भांडण नाही. भांडण नसणारी सोसायटी म्हणून या संकुलाची ओळख करून दिली जाते, अशी माहिती येथे राहणाऱ्या निवेदिका, अभिनेत्री संपदा वागळे यांनी दिली.
कचऱ्याच्या व्यवस्थापनात अग्रेसर
ठाणे शहरात गेली अनेक वर्षे कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. कचरा कुठे टाकावा येथपासून त्याची विल्हेवाट कशी लावावी असे प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र प्रकृती निवासी संकुलाने आपल्यापरीने तो सोडवून महापालिकेला त्यांनी सहकार्यच केले आहे. सदनिका ताबा घेतल्यानंतर म्हणजेच १६ वर्षांपूर्वी रहिवाशांनी संकुलाच्या परिसरात कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला. कचरा व्यवस्थापन करणारी ठाण्यातील ही पहिली वसाहत म्हणून या संकुलाकडे पाहिले जाते. येथे ओला आणि सुका कचरा असे कचऱ्याचे रहिवाशांमार्फतच वर्गीकरण केले जाते. जमा झालेल्या ओल्या कचऱ्यापासून संकुलातच गांडुळ खत निर्माण केले जाते. हे खत येथील उद्यानासाठी वापरण्यात येते. तसेच बाहेरच्या काही लोकांनी मागणी केल्यास ते त्यांना विनामूल्य देण्यात येते, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अरविंद कोतवडेकर (पांचाळ) यांनी दिली.
परोपकारी वृत्ती
संकुलात एक मोठी विहीर बांधण्यात आली आहे. त्याला कायमस्वरूपी पाणी असते. विहिरीचे कपडे, धुणे, भांडी घासणे, झाडे फुले आदी कामांसाठी वापरले जाते. हे पाणी संकुलाच्या शेजारी राहणाऱ्या इमारतींनाही दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनीही टाकण्यात आली आहे आहे. विनामूल्य पाणीपुरवठा करुन संकुलाने शेजारधर्म पाळून कोणताही स्वार्थ न ठेवता परोपकार वृत्तीही जोपासली आहे, असे खजिनदार एस. नटराजन यांनी सांगितले.
कार्यक्रमातून कर्तृत्वाचे कौतुक
निवासी संकुलात वर्षभरात सण उत्सव उत्साहाने साजरे करतात. होळी, दिवाळी, महिला दिन यांच्यासह विविध विषयांवरील मार्गदर्शनपर चर्चासत्र, आरोग्य शिबीर असे सामाजिक उपक्रमही पार पडतात. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संकुलातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. घर सांभाळून आपली आवड जोपासणाऱ्या आणि त्यातून काही नवनिर्माण करणाऱ्या महिलांचा महिला दिनाच्या कार्यक्रमात विशेष सत्कार केला जातो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना कार्यक्रमातून यथोचित मान देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जाते. स्वच्छचा अभियानाचा कार्यक्रमही दरवर्षी येथे राबविण्यात येतो. मुलांना स्वच्छतेबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी हा एक प्रयत्न असतो, मुलेही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असतात, असे संपदा वागळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एखाद्या विषयावर येथील भिंतीवर चित्र रेखाटण्यास सांगण्यात येते. मुलेही कौतुकास पात्र ठरावे अशी चित्रकला सादर करतात. संकुलात शास्त्रज्ञ डॉ. अविनाश गोखले, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त श्रीनिवास नाडगौडा, अनेक पेटंट मिळविणारे मिलिंद जोशी, ठाणे महापालिका आयुक्तांचे सचिव म्हणून काम केलेले सोसायटीचे अध्यक्ष अरविंद कोतवडेकर (पांचाळ), ज्येष्ठ लेखिका संपदा वागळे, लिटिल प्लॉवर शाळेच्या मुख्याध्यापिका अमला स्टॅनली, तसेच कचरा व्यवस्थापन पाहणाऱ्या वीणा जोशी, मीलन घोलबा, त्याचप्रमाणे उद्यानाची काळजी घेणारे किशोर गद्रे, रांगोळीकार प्रभा स्वामी आदी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व्यक्ती या संकुलात राहत आहेत. त्यांचा कार्याचा यथोचित सत्कार कार्यक्रमातून होत असतो. केसरीनाथ वेदक, सुभाष शहा, एन.आर.बालकृष्ण, कल्पना गोरे, कल्पना पाटणकर-जैन आदी क्रियाशील सभासदांची चांगली साथ सोसायटीला असते.
मुंबई ग्राहक पंचायत दारात
संकुलापासून तशी दुकानेही जवळ आहेत. परंतु महिन्याला लागणारा किराणा माल तेथून न घेता अनेक रहिवासी तो मुंबई ग्राहक पंचायतीकडून घेतात. संकुलातील अनेक रहिवासी ग्राहक पंचायतीचे सभासद आहेत. महिनाभरासाठी लागणाऱ्या किराणा मालाची यादी पंचायतीकडे दिल्यानंतर त्या यादीनुसार किराणा माल घेऊन ग्राहक पंचायतीची अन्नधान्य पुरवठा करणारी गाडी संकुलात येत असते. गाडी आल्यानंतर यादीप्रमाणे रहिवाशांमध्ये किराणा मालाचे वाटप होते, असे ए.व्ही. अभ्यंकर यांनी सांगितले.
सुविधा आणि सुरक्षा
संकुलात साईबाबांचे मंदिर असून समोरच ज्येष्ठांसाठी एक छोटेसे उद्यान आहे. या उद्यानात भारतीय बैठकीत गप्पांचा फड रंगत असतो. मुलांसाठी खेळाचे मैदान असून त्यात विविध खेळाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याचा आनंद मुले घेत असतात. कार्यक्रमासाठी इमारतीचा फलाटच व्यासपीठ म्हणून वापरला जातो. समोरच उद्यान असल्याने त्यावर खुच्र्या टाकून किंवा हिरवळीवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. गॅस पाईप लाईन, लिफ्टसाठी पॉवर बॅकअप आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाची व्यवस्थाही चांगली आहे. संकुलातील रहिवाशांना भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींची वाहने उभी करण्यासाठी वेगळी जागा करण्यात आली आहे. चार सुरक्षारक्षकांसह आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकांसाठी एक कक्ष असून हे सुरक्षा रक्षक कंत्राटी नसून सोसायटीनेच वेतनावर ठेवले आहेत. गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत. दूधवाला, लॉण्ड्रीवाला हेही वर्षांनुवर्षे एकच ठेवण्यात आले आहेत. इंटरकॉमची व्यवस्था आहे. ती थेट मित्तल पार्कच्या मुख्य प्रवेशाद्वारापर्यंत आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वाचनालय पेटीही येथे ठेवण्यात आली असून पुस्तकाचा आनंद प्रकृती निवासी संकुलासह शेजारील संकुलातील रहिवाशी घेत असतात.
करामध्ये सवलतीची अपेक्षा
प्रकृती संकुलकचरा व्यवस्थापनासारखा पर्यावरणस्नेही उपक्रम राबवून महापालिकेला एक प्रकारे सहकार्य करीत आहे. कचऱ्याच्या समस्येचा भार काही प्रमाणात का होईना संकुलाने स्वखर्चाने उचलला आहे. महापालिकेने त्याची दखल घेऊन करांमध्ये सवलत देऊन या उपक्रमास प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून सौरऊर्जा, पर्जन्य जलसंधारण आदी पर्यावरणस्नेही उपक्रम राबविण्याचे स्वप्नही पूर्ण करता येईल, अशी महापालिका प्रशासनाकडून अपेक्षा आहे. त्या संदर्भात सोसायटीने पत्रव्यवहारही केला असून प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर येत नसल्यामुळे संकुलातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे डीम्ड कन्व्हेयन्सही अद्याप झाले नसून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सोसायटीकडून सांगण्यात येते.

शिस्तीचा आदर, पर्यावरणाशी मैत्री
संकुलात वावरताना शिस्त आणि काटेकोरपणाचा अनुभव येतो. संकुलात कडुलिंब, गुलमोहर, पिंपळ, नारळ, औदुंबर, जास्वंद, गुलाब, चमेली आदी विविध प्रकारच्या फळाफुलांची झाडे आहेत. वसाहतीतील ही झाडे ताजी हवा आणि सावली देत असतात. त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना इजा करू नका याचे मर्म मनावर इतके काही बिंबवले गेले आहे की, येथील हट्टी, खोडकर मुलेही त्याचे पालन करतात आणि इतरांनाही तसे करण्यास सांगतात. उद्यानात बागडताना ही मुले कोणत्याही फुलांना, झाडांना हात लावत नाहीत. पाण्याची सर्वत्र टंचाई असताना येथे मात्र २४ तास पाणी आहे. परंतु तरीही त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी सातत्याने प्रबोधन येथे केले जाते. दिवसभरासाठी लागणारे पाणी किती आणि कशा प्रकारे वापरावे याचे धडे पत्रकामार्फत घरोघरी दिले जात असल्याने पाण्याचाही येथे योग्य वापर केला जात आहे. ऊर्जा बचतीसाठी संकुलात एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. कोणतीही रिक्षा ही मित्तल पार्कमध्ये येत नाही. यायची झाल्यास तशी दूरध्वनीवर सूचना देण्याचे बंधन सुरक्षारक्षकांवर असते. केवळ लॉण्ड्रीवाला, दूधवाला यांनाच केवळ प्रवेश दिला जातो, असे सक्रिय सभासद ए.वी.अभ्यंकर यांनी सांगितले.
सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com