वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत खासगी बसगाडय़ांची प्रवासी वाहतूक

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिवहन उपक्रमाच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनाला दोन महिन्यांची मुदत देऊ केली असली तरी टीएमटीच्या नफ्याच्या मार्गावर खासगी आणि बेकायदा वाहतूकदार डल्ला मारत असल्याचे चित्र कायम आहे. जास्त प्रवासी संख्येमुळे उत्पन्नाचा हमीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे ते घोडबंदर मार्गावरील टीएमटीच्या थांब्यांवरून काही खासगी बसचालक चक्क प्रवाशांची पळवापळवी करत असून टीएमटी व्यवस्थापन, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून खासगी बसची बेकायदा वाहतूक सुरू आहे. ठाणे शहरातील मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग अशा दोन्ही महामार्गावरून ही वाहतूक सुरू आहे. ठाण्याचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांनी मध्यंतरी या बसगाडय़ांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर ही बससेवा काही काळ बंद झाली होती. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीनंतर मात्र ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे परिवहन उपक्रम प्रवाशांना पुरेशी बससेवा पुरविण्यात अपयशी ठरल्यामुळे अनेक प्रवासी खासगी बस वाहतुकीकडे वळले आहेत. परंतु या बसचालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढू लागली असून मध्यंतरी एका प्रवाशाला खासगी बसचालक आणि क्लिनरने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतरही ही बससेवा बिनदिक्कतपणे शहरात सुरू असल्याचे चित्र आहे.

ठाणे पूर्व ते कासारवडवली या मार्गावर अनेक ठिकाणी टीएमटीचे बस थांबे उभारण्यात आले असून त्याठिकाणी टीएमटीऐवजी खासगी बसगाडय़ा एकामागोमाग उभ्या असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन मार्गिका खासगी बसचालकांकडून अडविण्यात येतात. त्यामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांना थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होत नाही. कसारवडवली, वाघबीळ, ओवळा, मानपाडा, कापुरबावडी आणि माजविडा या भागात हे चित्र पहावया मिळते. या भागात सिग्नलजवळ तसेच उड्डाण पुलाखाली बस थांबे असल्यामुळे त्याठिकाणी खासगी बसगाडय़ांच्या रांगा लागतात. या गाडय़ा बेशिस्तपणे उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच क्लीनरकडून बसच्या दरवाजात लटकून बाहेर डोकावण्याचे प्रकारही सुरू असतात. त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो.

उड्डाणपुलांच्या पायथ्याशी बसथांबे..

ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावरील उड्डाण पुलांच्या पायथ्यांना खासगी बसचालकांनी बेकायदा बस थांबे बनविले असून या थांब्यांवरून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी उड्डाण पुलाच्या पायथ्याशी खासगी बस उभ्या केल्या जात असून या प्रकारांमुळे उड्डाणपुलांवर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खासगी बसगाडय़ांवर कारवाई करण्यासाठी तीन हात नाका ते माजिवाडय़ापर्यंत पोलीस कर्मचारी नेमण्यात येतात. त्यांच्यामार्फत अशा बसगाडय़ांवर कारवाई करण्यात येते. कर्मचारी जागेवर असेपर्यंत वाहतूक होत नाही. मात्र, कर्मचारी जागेवरून हटताच बसची वाहतूक पुन्हा सुरू होते. या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस असे संयुक्त पथक तयार करून बसगाडय़ांवर कारवाई करण्याचा विचार आहे. 

-संदीप पालवे, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त