नागरिकांच्या एकजुटीनंतर पोलीस सरसावले

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात गर्दी करणाऱ्या खासगी बसगाडय़ांविरोधात उशिरा का होईना, वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका खासगी बसची धडक लागून ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्यानंतर कोपरी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या बसगाडय़ांना प्रवेशबंदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनीही तत्परतेने हालचाली करत खासगी बस बारा बंगला चौकात अडवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त दिसू लागला आहे.

ठाणे महापालिका परिवहन विभागाची बससेवा व्यवस्थित नसल्याने शहराच्या बाह्य भागातून ठाणे स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांची संख्या वाढत चालली आहे. घोडबंदर येथून येणाऱ्या बसगाडय़ा कोपरीमार्गे ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात येत असतात. या बसगाडय़ांच्या वर्दळीमुळे कोपरी तसेच ठाणे पूर्व स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिवहन विभागाचा वाहतूक परवाना नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बसगाडय़ांवर तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी जोरदार कारवाई सुरू केली होती. परंतु, त्यांची बदली होताच पुन्हा एकदा ही बेकायदा बसवाहतूक सुरू झाली आहे. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतरही वाहतूक पोलिसांनी आजवर या वाहतुकीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपघातानंतर कोपरीवासीयांनी एकजूट दाखवत पोलिसांना ही वाहतूक बंद करण्यास भाग पाडले.

ठाण्यातील कोपरी भागात रस्ता ओलांडत असताना ६४ वर्षीय भगवान ढेंगणे यांना खासगी बसने धडक दिली. या धडकेत त्यांना जबर दुखापत झाली. यानंतर कोपरीतील स्थानिक रहिवासी एकवटले व त्यांनी या खासगी बस चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला केली. स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून अखेर पोलिसांनी या बस चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. घोडबंदर येथून येणाऱ्या खासगी बसेस व कंपनीच्या बसेस बारा बंगला येथे थांबविण्यात येत असून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून बाराबंगला येथे सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत पोलिसांची कारवाई सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथे बसेसची अवैध वाहतूक  सुरु आहे. बसचालक बेदरकारपणे बस चालवित असल्याने शाळकरी मुलांना तसेच वृद्धांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. त्यामुळे या बस चालकांविरोधात कोपरीकर एकवटले असून बारा बंगल्यापूढे ही वाहतूक होऊ देणार नसल्याचा निर्णय येथील स्थानिकांनी घेतला आहे. बस चालकांविरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्री, पालिका आयुक्त आणि पोलीस या सर्वाना निवेदन देण्यात आले आहे.

–  राजेश गाडे, स्थानिक