मुजोर खासगी वाहनचालकांनाही स्थानकाचाच आधार; प्रवासी बेदखल

बदलापूरकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणाऱ्या नेते मंडळींना शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस स्थानकाच्या दुरवस्थेकडे पाहण्यास उसंत नसल्याचे जाणवत आहे. या स्थानकाला गेल्या काही महिन्यांपासून अनेक समस्यांनी वेढले आहे. या समस्यांची कोंडी कशी फुटणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रयत्न सुरू नसल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्थानकात काही रहिवासी खासगी वाहने उभी करू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना आणि बस चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विठ्ठलवाडी बस आगाराच्या अंतर्गत बदलापूर एसटी स्थानक येते. येथून दिवसाला सुमारे ८० बस फेऱ्या होतात. या स्थानकातील ९ बस गाडय़ांपैकी ७ गाडय़ा प्रत्यक्ष रस्त्यावर धावतात. शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावांना जोडण्याचे महत्त्वाचे काम या बसेस करतात. परंतु या ग्रामीण भागातील प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. शहरी मंडळींना स्मार्ट सिटीचे गाजर दाखवायचे आणि ग्रामीण भागातील मंडळींना वाऱ्यावर सोडायचे, हाच येथील राजकीय मंडळींचा शिरस्ता असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली. मोठा गाजावाजा करीत नेते मंडळींकडून धुळे, शेगाव, नगर आणि पुणे या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली होती; परंतु ही बससेवा जेमतेम एक महिन्यातच बंद पडल्याचे सूत्राने सांगितले.
खासगी गाडय़ांमुळे नुकसान
बदलापूर शहराच्या लगत असलेल्या काही ठरावीक मार्गावर खासगी वाहने चालतात; परंतु जी गावे मुख्य रस्त्यांपासून लांब आहेत, त्या भागांतील गावकऱ्यांना एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु त्या मार्गावर सक्षम सेवा देण्याची क्षमताच एसटीकडे नाही. तसेच रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर एसटी स्थानक असल्याने खासगी गाडी चालकांचे चांगलेच फावते. या समांतर खासगी वाहतुकीमुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांकडे वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याची प्रतिक्रिया येथील वाहतूक नियंत्रक पी. एल. चव्हाण यांनी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा
बदलापूर स्थानकातून रात्री सुटणाऱ्या बस त्या त्या गावात मुक्कामी जातात. त्या वाहक, बसचालकांना बसमध्ये झोपावे लागते. तर बदलापूर स्थानकात असलेल्या खोल्यांमध्ये गैरसोयच जास्त असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. एकूण १६ कर्मचारी या ठिकाणी काम करतात.

स्वच्छतागृह नाही
या स्थानकातून दिवसभरात सुमारे तीन हजार प्रवाशांची वाहतूक होते. प्रवाशांसाठी पत्र्याची शेड आहे, तर पिण्याच्या पाण्यासाठी एक कूलर आहे. महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही. स्थानकाशेजारी असलेल्या कचराकुंडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एका पोलीस चौकीची आवश्यकता आहे. स्थानकाला संरक्षक भिंत नसल्याने कोणीही आपली गाडी या ठिकाणी उभी करून जाते. त्यामुळे बस चालकांसह प्रवाशांनाही त्याचा अडथळा निर्माण होतो. या मुजोर वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांसह येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.