‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजने’अंतर्गत चार विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना यादव या उपस्थित होत्या. या बैठकीच्या विषय पटलावर अनेक विषय होते. त्यामध्ये अपघातात मृत पावलेल्या चार विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून अनुदान देण्याचा प्रस्तावही होता. जिल्हा परिषदेमार्फत अशा स्वरूपाचे प्रस्ताव सादर करण्यात येतात आणि त्यास जिल्हा समितीमार्फत मान्यता देण्यात येते. त्यानंतर हे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतात आणि त्याप्रमाणे शासन निधी उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा समितीपुढे आणला होता. त्यास बैठकीमध्ये अंतिम मान्यता देण्यात आली असून निधी मिळण्यासाठी तो आता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.अपघातानंतर विद्यार्थ्यांना काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, या उद्देशातून राज्यातील इयत्ता पहिलीपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात सुरक्षा योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेनुसार कोणत्याही शाळेतील विद्यार्थी अपघातात मृत्युमुखी पडल्यास त्याच्या पालकांना ७५ हजार रुपयांचे अनुदान तर अपघातात दोन अवयव निकामी झाल्यास ५० हजार तसेच एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग अशा सर्व प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळतो.