पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेला आता मॅरेथॉन स्पर्धेच्या तोंडावर खड्डेभरणीची आठवण झाली आहे. मॅरेथॉन मार्गाच्या पाहणीदरम्यान रस्त्यांची झालेली चाळण पाहून संतापलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यामुळे गुरुवारपासून पालिकेने रस्त्यांची डागडुजी करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोशिएशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार असून त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि कोकण या भागांत आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी भाजप आणि मनसेने केली होती. या मागणीमुळे ही स्पर्धा रद्द होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून त्याच्या नियोजनासाठी निधीही खर्च करण्यात आल्याचे सत्ताधारी शिवसेनेने स्पष्ट केले होते. तसेच ही स्पर्धा रद्द केली तर त्यावर खर्च झालेले पैसे वाया जाण्याची भीती व्यक्त करत शेवटच्या क्षणी स्पर्धा रद्द करणे शक्य नसल्याचेही शिवसेनेने स्पष्ट केले होते. यामुळे स्पर्धा होणार असल्याचे निश्चित झाले असले तरी या स्पर्धेपुढे शहरातील खड्डय़ांचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

महापालिका मुख्यालयापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महापालिका मुख्यालय, नितीन कंपनी, तीन हात नाका, मॉडेल चेक नाका, रस्ता क्रमांक १६, रस्ता क्रमांक २२, इंदिरानगर, सावरकनगर, यशोधननगर, कोरस कंपनी, वर्तकनगर, शिवाईनगर, वसंत विहार, हॅपी व्हॅली, मानपाडा, ब्रह्मांड, पातलीपाडा, कापुरबावडी, कॅडबरी, नितीन कंपनी, भक्तीमंदिर रोड, ओपन हाऊस, महापालिका मुख्यालय असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. यापैकी बहुतेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांवरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू धावायलाही तयार होणार नाहीत किंवा धावपटूंना दुखापती झाल्यास पालिकेला मोठय़ा नामुष्कीला तोंड द्यावे लागेल, याची कल्पना आल्याने पालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत आता खड्डेभरणीला सुरुवात झाली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी मंगळवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनीही खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मॅरेथॉन मार्गासह शहरातील खड्डे बुजविण्याची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली.