वसई-विरारमध्ये २६ दिवसांत १० लाखांचा दंड वसूल

शहर अस्वच्छ करणाऱ्या नागिरकांविरोधात वसई-विरार महापालिकेने स्वच्छतादूतांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतादूतांची नेमणूक झाल्याच्या २६ दिवसांतच १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात कचरा टाकणारे तसेच इतर अनेक मार्गाने शहर अस्वच्छ करणाऱ्या लगाम घालण्यासाठी महापालिकेने स्वच्छतादूतांची (क्लिनअप मार्शल) नेमणूक केली आहे. यासाठी महापालिकेने नवीन प्रस्ताव मंजूर करून २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी चार कंपन्यांना ठेका दिला आहे. १० नोव्हेंबर २०१८ स्वच्छतादूतांचे काम सुरू झाले. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या २६ दिवसांत १० लाख ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये रस्त्यावर थुंकणे, कचरा करणे, वाहनातून कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे अशा गुन्ह्य़ांचा समावेश आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये तारांकित मानांकनामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने तसेच शहरात स्वच्छता अबाधित राहण्यासाठी धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणारी अस्वच्छता यासाठी असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मात्र कारवाईला सुरुवात करण्याआधी ठेकेदाराने याबाबत जनजागृती करून जागोजागी फलक लावण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारचे जनजागृतीविषयक कार्यक्रम न राबवताच दंड वसूल केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच काही स्वच्छतादूतांकडून दमदाटी करून दंड वसूल केला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. जे स्वच्छतादूत दमदाटी करून दंड वसूल करत आहेत आणि जनजागृती करण्यात यावी यासाठी संबंधित ठेकेदार व नेमण्यात आलेले स्वच्छतादूतांची विशेष बैठकही घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले. पालिकेतर्फे जनजागृतीसाठी जाहिरात फलक शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा आणि अस्वच्छता नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेतर्फेही जनजागृती केली जाणार आहे.

– वसंत मुकणे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अधिकारी