ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात तरुणाईचीही झुंबड
त्याने बॅट सोडून तीन वर्षे लोटली तरी आजही क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या दर्शनाने ठाणेकरांचा स्वातंत्र्य दिन सोमवारी भारलेल्या वातावरणात पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठाणे पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात केवळ सचिनला पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने तरुण वर्ग ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या परिसरात लोटला होता. या सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच सचिनने ‘स्वातंत्र्याचा भरभरून आनंद लुटा; परंतु आयुष्याची सायंकाळ अनुभवणाऱ्या आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची काळजी घेण्यास विसरू नका’ अशा शब्दांत या तरुणाईला साद घातली.
ठाणे पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कर्तव्य’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमास सचिन गडकरी रंगायतन येथे आले होते. आलेख या संस्थेच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या उपक्रमास टाटा सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण शहरात तसेच गडकरी रंगायतन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रंगायतनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी
करून त्यांना आत प्रवेश दिला जात होता. सचिनच्या आगमनाचे शहरात सर्वत्र फलक लागल्याने सकाळपासूनच त्याची छबी टिपण्यासाठी गडकरी रंगायतनभोवती तरुणांचे जथे दिसून येत होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या या उपक्रमासाठी ज्येष्ठांसोबत तरुणही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आसनव्यवस्थेवर जागा शिल्लक नसल्यामुळे अनेक जण त्याशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत उभे होते. सभागृह गच्च भरलेले होते आणि सचिनची आतुरतेने वाट पाहत होते. सचिनचे व्यासपीठावर आगमन झाले आणि सभागृह ‘सचिन.. सचिन..’च्या जयघोषाने दुमदुमले.
ज्येष्ठांसाठीच्या या कार्यक्रमास तरुणाईची गर्दी पाहून मग सचिनने आपल्या भाषणातून चौकार, षटकार लगावत काही मौलिक सल्लेही दिले. तरुणांचा देश असला तरी देशात दहा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे नागरिक म्हणजे आपल्यासाठी सुवर्णपिढी आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या आयुष्यात ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला किती मोलाचा असतो, हे पटवून देण्यासाठी स्वत:च्या कुटुंबातील अनेक उदाहरणे दिली. या भाषणातून त्याने तरुणाईची नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचीही मने जिंकून घेतली.
कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी सचिनसोबत सेल्फी काढण्यासाठी व्यासपीठाकडे धाव घेतली, पण पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

पूर्वीच्या संयुक्त कुटुंब पद्धतीत बदल झाल्याने आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागते. त्यामुळे त्यांना सतत एकटेपणाची जाणीव होत असते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासोबत होणारे गैरवर्तन तसेच अन्यायाविरोधात तक्रारही करता येत नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांना आत्मसन्मान मिळवून देता यावा म्हणून ‘कर्तव्य’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची एक प्रकारे जाणीव करून दिली जाणार आहे.
– आशुतोष डुम्बरे, सहपोलीस आयुक्त, ठाणे</strong>

कार्यक्रम आटोपताच सचिनने लागलीच ट्वीट करीत ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यास हजारो ट्विटरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. आपल्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घ्यायला विसरू नका, असा भावनिक सल्ला ट्विटरच्या माध्यमातून सचिनने दिला.