|| पूर्वा साडविलकर

श्रोत्यांसाठी नवनवीन विषयांची चावडी  :- सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराच्या या जडणघडणीत विविध ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या कट्टय़ांचे नेहमीच योगदान राहिले आहे. साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर शहरात अनेक कट्टे सक्रिय आहेत. या कट्टय़ांवर जुन्या-जाणत्यांसह तरुणवर्गही रुळताना दिसतो. मात्र, आता या कट्टय़ांचे जग विस्तारले असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि भटकंती हे विषयही तेथे चर्चिले जाऊ लागले आहेत. सांस्कृतीक चळवळींचा वारसा जोपसणाऱ्या या कट्टय़ांमध्ये कुसुमाग्रज, सावरकर, विज्ञान, भटकंती आणि सांस्कृतिक कट्टा या नावाने सुरू झालेली वेगवेगळ्या विषयांची चावडी रसिकांची मोठी गर्दी खेचताना पाहायला मिळत आहे.

सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळ सुरू व्हावी तसेच रुजावी यासाठी ठाणे शहरातील काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे कट्टे सुरू आहेत. नौपाडा परिसरात सुरू असलेल्या अत्रे कट्टय़ावर अनेक वेगवेगळ्या विषयांवर दर्जेदार कार्यक्रम आजही सुरू असतात. नौपाडा, विष्णुनगर, बी केबीन परिसरातील वेगवेगळ्या संस्था, सभागृहांमधून सतत सुरू राहणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे जुन्या ठाण्याची वेगळी ओळख ठरली आहे. असे असताना केवळ सांस्कृतिक विषयांशी निगडित न राहाता भटकंती आणि विज्ञान यांसारख्या विषयांचे पदर उलगडून दाखविण्यासाठी याच भागात सुरू झालेले नवे कट्टे अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरले आहेत. शहरातील नागरिकांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्याचबरोबर विज्ञानाबद्दल ज्या काही शंका आहेत त्या शंकेचे निरसन व्हावे आणि विज्ञानाविषयी अधिक ज्ञान स्थानिक नागरिकांना मिळावे यासाठी शहरात विज्ञान कट्टा सुरू करण्यात आला आहे. तर, अलीकडे अनेकांचा गिर्यारोहणला जाण्याचा कल वाढला आहे. गिर्यारोहणला केवळ आनंद लुटण्यासाठी नाही तर या भटकंतीतून खूप काही पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे असते. या भटकंतीच्या माध्यमातून अनुभवलेल्या गोष्टी इतरांनादेखील समजाव्या तसेच इतरांचे अनुभवदेखील आपल्याला कळावे यासाठी भटकंती कट्टा नव्याने ठाण्यात सुरू करण्यात आला आहे.  परिसरातील लहान मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कलेला वाव देण्यासाठी लोकमान्यनगर येथे सावरकर कट्टा सुरू करण्यात आला आहे. या कट्टय़ावर वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने त्याचबरोबर सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. समतानगर येथे तरुणांच्या तसेच ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी कुसुमाग्रज कट्टा सुरू करण्यात आला आहे. या कट्टय़ावर सांस्कृतिक तसेच शैक्षणिक विषयांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात.  या नवीन कट्टय़ांना शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कट्टय़ांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. तसेच सामान्य माणसांना आपले विचार मांडण्यासाठी हे उत्तम असे व्यासपीठ आहे. त्यामुळे शहारात कट्टय़ांची निर्मिती होणे गरजेचे आहे. – संपदा वागळे, संस्थापिका, आचार्य अत्रे कट्टा, ठाणे