पालिका प्रशासनाचा दावा; रुग्णवाहिकेसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पालिकेची पावले

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण असून त्यातच आता शहरात करोनाची दुसरी लाट आल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने रुग्णवाहिकेसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, ताप सर्वेक्षणाच्या कामासाठी २५ खासगी डॉक्टरांची नेमणूक करणे, बोरिवडे येथील करोना रुग्णालय सुरू करणे, अशी कामे पालिकेने हाती घेतली आहेत. या सर्वच कामांचे सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार करून १९ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या तीन ते चार महिने करोनाचा संसर्ग आटोक्यात होता. या कालावधीत शहरात दररोज सरासरी ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात रुग्ण पुन्हा वाढू लागले असून शहरात आता दररोज सरासरी दोनशे ते तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. या पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासंबंधी पालिका प्रशासनाने पावले उचलली असून त्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचे काही प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले आहेत. या प्रस्तावामध्ये शहरात करोनाची दुसरी लाट आल्याचा दावा केला असून त्यासाठी रुग्णवाहिकांच्या पुरवठय़ासाठी दरपत्रक तयार केले आहे. या रुग्णवाहिकांच्या खर्चापोटी येणाऱ्या रकमेस मान्यता देण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी ठाणे शहरात करोना संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी ताप तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी शहरातील ३५ खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली होती. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर केवळ ७ डॉक्टर कार्यरत होते, परंतु आता रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने पुन्हा ताप तपासणी मोहीम सुरू केली असून त्यासाठी २५ खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ४५ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. त्याचबरोबर घोडबंदर येथील बोरिवडे भागात एका संस्थेच्या मदतीने पालिकेने करोना रुग्णालय उभारले होते. रुग्णसंख्या कमी असल्यामुळे हे रुग्णालय सुरू झाले नव्हते. मात्र आता रुग्ण वाढू लागल्याने ते सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

रुग्णवाहिकांचे दरपत्रक

रुग्णवाहिकांच्या पुरवठय़ासाठी पालिकेने दरपत्रक निश्चित केले आहे. कॉर्डिअक रुग्णवाहिकेच्या १५ किलोमीटरच्या सेवेसाठी पालिका ७ हजार रुपये, त्यापुढे १६ ते २० किमीसाठी ८ हजार ५०० रुपये, २१ ते २५ किमीसाठी ११ हजार ५०० रुपये आणि २६ ते ३० किमीसाठी १२ हजार ५०० रुपये पालिका खर्च देणार आहे. यासाठी पाच लाखांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे, तर मोठय़ा साध्या रुग्णवाहिकेच्या १० किमीपर्यंतच्या सेवेसाठी ७०० रुपये, ११ ते २० किमीसाठी १३०० रुपये, २१ ते ३० किमीसाठी १७०० रुपये आणि ३० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी २५ रुपये प्रति किमी दराने आणि प्रतीक्षा कालावधीसाठी ७५ रुपये प्रति तास असे पैसे पालिका देणार आहे. या कामासाठी २५ लाखांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.