पालिका निवडणुकांच्या तोंडावर दलित वस्त्यांमधील विकास कामांना वेग

ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक पूर्व कामांचा वेग वाढवल्याचे चित्र दिसत आहे.  ठाणे जिल्ह्य़ातील दलित वस्त्यांमधील सुधारणांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे, आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ  साठे नागरी दलित वस्ती सुधारणा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिले. जिल्ह्य़ातील महानगरपालिका क्षेत्रात २५ कोटी १२ लाख तसेच नगरपालिका क्षेत्रात १३ कोटी रुपये खर्च करून कामे सुरू आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.

निवडणुका जवळ येऊ लागताच सर्वच राजकीय पक्षांकडून विकास कामांचा धडाका सुरू होतो. मतदारांसाठी वेगवेगळी विकास कामे, योजना आखून एकगठ्ठा मतांची तजवीज यानिमित्ताने होत असते.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय बैठकांचा धडाका लावला असून जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना आक्रमक असल्याचे चित्र पद्धतशीरपणे उभे केले जात आहे. दलित वस्त्यांमधील विकासाकरिता ठाणे, उल्हासनगर तसेच जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात निधीचे वाटप करण्यात आले आहे.यापैकी बराचशा निधीचे वाटप केल्याचे जिल्हा प्रशासनाने आयोजित  बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीत आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

निधीनामा

* २०१६-१७ वर्षांसाठी महानगरपालिका क्षेत्रात २१ कोटी  नगरपालिका क्षेत्रात १० कोटी रुपये जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर केले आहेत.

*ठाणे महापालिकेसाठी सात कोटी,

* मीरा-भाईंदर पालिकेसाठी पाच कोटी,

*कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी पाच कोटी तेहत्तीस लाख,

*उल्हासनगर पालिकेसाठी पाच कोटी,

*अंबरनाथ पालिकेसाठी पाच कोटी,

*कुळगाव-बदलापूर पालिकेसाठी सहा कोटी पासष्ठ लाख,

*मुरबाडसाठी तीन कोटी बारा लाख

*शहापूरसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.