गेल्या आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या पारनेरमधील पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने पक्षांतराचा विषय
प्रतिष्ठेचा केल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नगरसेवकांना पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा सल्ला दिला. पारनेरचा वाद मिटला असला तरी ठाण्यात मात्र शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते हमरीतुमरीवर आले.
नगर जिल्ह्य़ातील पारनेर नगरपंचायतीमधील नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या पाच नगरसेवकांनी गेल्या शनिवारी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्या पक्षांमध्ये फोडाफोडी सुरू झाल्याने त्याची प्रतिक्रि या उमटली. या पक्षांतरातून भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.
पाचही नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत. लंके हे आधी शिवसेनेत होते, पण स्थानिक राजकीय वादातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून निवडून आले होते. राष्ट्रवादीने नगरसेवक फोडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. संपर्क नेते भाऊ कोरगावकर यांच्यामार्फ त या नगरसेवकांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे संदेश देऊन त्यांना नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सांगितले. या फोडाफोडीबद्दल शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतरच अजित पवार यांनी स्थानिक आमदार लंके यांना या नगरसेवकांची शिवसेनेत पाठवणी करावी, अशी सूचना केली. यानुसारच सूत्रे हालली आणि या नगरसेवकांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश झाला.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षांच्या टीकेने वाद
ठाणे : शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेवून शांत बसले आहेत आणि त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बुधवारी दोन्ही पक्षांतील नव्या कलहाला तोंड फोडले. शिवसेनेनेही ‘रस्त्यावर उतरलात तर पालकमंत्र्यांचे काम दिसेल’ अशा शब्दांत परांजपे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘ठाणे शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरु आहे. कोविड कक्षातील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात येईल. त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरीबांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठाणे पालिकेने रुग्णालयातील बिलांसाठी लेखापरीक्षक नेमण्याची घोषणा केली असली तरी अनामत रक्कम घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. लाखो रुपयांची बिले दिली जात आहेत. पालिकेने नेमलेल्या नोडल अधिकांऱ्यामध्ये समन्वय नाही, अशी टीका आनंद परांजपे यांनी बुधवारी केली.