कल्याण डोंबिवली पालिकेच्या सोळा स्थायी समिती सदस्यांची बुधवारी निवड झाल्यानंतर स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत शहरवासीयांना विकासाचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी स्थायी समितीच्या सर्व सदस्यांना सामंजस्याने घेऊन चालणारा आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळून विकास कामे मार्गी लावणारा चेहरा, म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी शेलार यांचे नाव भाजपमध्ये घेतले जात आहे.

पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या करारानुसार महापौर पद शिवसेनेला तर, स्थायी समितीपद भाजपला देण्याचे ठरले आहे. सदस्यांची निवड झाल्यानंतर, सभापतीपदी कोण या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या पाच वर्षांत महापौर कल्याणचाच राहिला. पुन्हा यावेळी कल्याणचा महापौर झाला आहे. डोंबिवलीने पालिका निवडणुकीत भाजपला भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे एक तरी मानाचे पद डोंबिवलीला द्या, अशी  डोंबिवलीकरांची मागणी आहे. त्यामुळे मानाचे स्थायी समिती पद डोंबिवलीला मिळावे, यासाठी डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेवकांनी हट्ट धरला आहे.

सभापतीपदासाठी कल्याणमधून संदीप गायकर, डोंबिवलीतून विकास म्हात्रे, शिवाजी शेलार अशी नावे चर्चेत आली आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि बिनविरोध जिंकून आलेले नगरसेवक शिवाजी शेलार हे सभापतीच्या चौकटीत बसू शकतात, या निर्णयाप्रत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आल्याचे सूत्रांकडून समजते.

आधीच्या ‘कर्तृत्वांचा’ विचार

गेल्या पाच वर्षांत स्थायी समितीच्या सभापतींनी विकासकामे मार्गी लावण्यापेक्षा अन्य कारणांसाठी गाजवलेल्या ‘कर्तृत्वामुळे’ शिवसेना टीकेची धनी झाली होती. त्याचा फटका पालिका निवडणुकीत शिवसेनेला बसला. याची जाणीव भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना असल्याने, स्थायी समिती सामंजस्याने चालवेल, असा संयमित, सर्वाना सामंजस्याने बरोबर घेऊन चालणारा चेहरा देण्याच्या हालचाली सुरूआहेत.