गतवर्षीच्या तुलनेत गेल्या पाच महिन्यांत ३५ टक्केच उत्पन्न
ठाणे : करोना प्रादुर्भावानंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम सरकारी क्षेत्रावरही झाला आहे. टाळेबंदीमुळे वाहनविक्री मंदावल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे गेल्या पाच महिन्यांतील उत्पन्नही घटले आहे. गतवर्षीच्या मार्च ते जुलै महिन्यांच्या तुलनेत यंदा ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई व कल्याण आरटीओंमध्ये केवळ ३५ टक्केच महसूल जमा झाला.
जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन ठिकाणी उपप्रादेशिक कार्यालये आहेत. या जिल्ह्यात वाहन खरेदी-विक्री व्यवहाराचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. परिणामी या वाहन विक्रीच्या माध्यमातून राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाला रस्ते कर, पर्यावरण कर, वाहन नोंदणी कर, परवाना नूतनीकरण कर, परमिट कर अशा विविध करांच्या स्वरूपात कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. साधारण जानेवारी ते जुलै या कालावधीत बस, जड-अवजड वाहने आणि चार चाकी गाडय़ांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन उपप्रादेशिक कार्यालयांमधून २५० कोटींहून अधिक महसूल मिळतो. मात्र, यंदा त्यात घट झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च ते जुलै या कालावधीत ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे १८८.८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदा मात्र, ही रक्कम ६७ कोटींच्या घरात आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या वर्षी मार्च ते जुलै या काळात ९३.२५ कोटी इतका महसूल जमा झाला होता. यंदा या कार्यालयात केवळ ३५.६९ कोटी इतकाच महसूल जमा होऊ शकला. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यावर्षीच्या पाच महिन्यांत ८१.६० कोटी इतका महसूल मिळाला होता. यंदा त्यात ६४ टक्क्यांची घट होऊन ३०.०५ कोटी इतकेच उत्पन्न या कार्यालयाला मिळू शकले.
अचानक ओढवलेल्या करोनाच्या संकटामुळे नागरिकांमधील आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाली असली तरी नागरिकांचा वाहन खरेदी करण्याचा कल कमी झाला आहे. परिणामी नवीन वाहनांच्या नोंदणीमुळे प्रादेशिक परिवहन विभागाला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे.
– रवी गायकवाड, प्रादेशिक परिवहन विभाग प्रमुख, ठाणे