डोंबिवलीतील खंबाळपाडा, भोईरवाडी भागातील डांबरी रस्त्यांवर महापालिकेच्या ठेकेदाराने माती टाकण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धूळ उडत आहे. या धुळीने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत.
डोंबिवलीतील अनेक रस्त्यांच्या कडेला सेवा वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यावर सीमेंट, डांबर टाकण्याऐवजी ठेकेदाराच्या कामगारांनी माती लोटून ठेवली आहे. पावसात या मातीचा चिखल होणार आहे. पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होणार आहे. पाणीटंचाईमुळे रहिवाशांनी महापालिकेकडून तात्पुरत्या जलवाहिन्या घेताना रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवले आहेत. या खोदलेल्या रस्त्यांची माती रस्त्यावर टाकून ठेवण्यात आली आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते, वाहिन्या टाकून झाल्यानंतर पुन्हा योग्य रीतीने बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर आडवे चर तयार झाले आहेत.

खंबाळपाडा रस्ता मातीमय
खंबाळपाडा तसेच याच भागातील भोईरवाडीत डांबरी रस्त्यावरील खड्डे ठेकेदाराने थेट मातीने भरले आहेत. या रस्त्यावरून सध्या वाहने गेली की चोहोबाजूने धूळ उडून लगतच्या घरांमध्ये जात आहे. या मातीमधील दगडांवर दुचाकी घसरल्याने, दुचाकी स्वार खाली पडतात.