News Flash

नव्या वर्षांत जुन्या प्रकल्पांच्या पूर्ततेची आस

जैवविविधता उद्यान, पारसिक चौपाटीचे काम मार्गी

अनेक प्रकल्पांचा शुभारंभ शक्य; तिसरा खाडी पूल, जैवविविधता उद्यान, पारसिक चौपाटीचे काम मार्गी

टीम ठाणे

ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमधील नागरिकांचे जगणे किमान सुसह्य़ करू पाहाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ नव्या वर्षांत होईल, अशी सुचिन्हे जुन्या वर्षांला निरोप देताना दिसू लागली आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन ही सरत्या वर्षांची येथील नागरिकांना मोठी भेट म्हणावी लागेल. या प्रकल्पांची कामे जोमाने सुरू असल्यामुळे ठाणेकरांना दररोज असह्य़ अशा वाहनकोंडीने घेरले असले तरी नव्या वर्षांत कळवा खाडीवरील पूल तसेच महामार्गाची कोंडी काही अंशी कमी करणारी कोपरी पुलाची मार्गिका सुरू होईल, असे चित्र आहे. यासोबत कल्याण-डोंबिवलीकरांची वाहनकोंडीतून काही प्रमाणात सुटका करणाऱ्या पत्रीपुलाचे कामही येत्या काही महिन्यांत मार्गी लागण्याची चिन्हे असून कोपर पुलाच्या कामासोबत काही रेल्वे पादचारी पुलाची कामेही नव्या वर्षांत मार्गी लागतील, असा दावा केला जात आहे.

तिसरा खाडी पूल

ठाणे आणि कळवा शहराला जोडण्यासाठी खाडीवर तिसऱ्या उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत आवश्यक परवानग्या मिळवून प्रशासनाने पुलाचे काम वेगाने सुरू केले असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे कळवा, विटावा, साकेत, सिडको आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

ठाणेकरांसाठी जैवविविधता उद्यान खुले

पर्यावरणाचे जतन करतानाच पर्यटनालाही चालना मिळावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी कळवा खाडीजवळ शासनाच्या वन विभागाच्या अंतर्गत ‘स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण आणि जैवविविधता उद्यान’ विकसित करण्यात येत आहे. ५.२६ हेक्टरवर जागेवर हे उद्यान विकसित करण्यात येत असून त्यासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे या प्रकल्पाच्या काम लांबणीवर पडले आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून यंदाच्या जून महिन्यात हे उद्यान खुले होणार आहे.

कोपरी पुलाचा पहिला टप्पा मे महिन्यापर्यंत

कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पाच महिन्यात म्हणजेच मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहे. जुन्या कोपरी पुलालगत नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी खांब उभारणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्टील गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. येत्या फेब्रुवारी महिनाअखेर खांब उभारणीचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील अडीच महिन्यात गर्डरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यानंतर जुना पूल पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे.

५० तेजस्विनी बसगाडय़ा

ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा या उद्देशातून टीएमटीला ५० तेजस्विनी बसगाडय़ा खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून यापूर्वीच निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून परिवहन प्रशासनाने बसगाडय़ांची खरेदी केली आहे. त्यापैकी दहा बसगाडय़ा टीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्या शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत. तसेच आणखी २० बसगाडय़ा टीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित २० बसगाडय़ा जानेवारी महिनाअखेपर्यंत ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत महिलांना ५० तेजस्विनी बसगाडय़ा उपलब्ध होणार आहेत.

दोन पादचारी पूल

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मानपाडा येथील कारमेल शाळेसमोर आणि वाघबीळ या दोन ठिकाणी हे पादचारी पूल उभारले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. येत्या वर्षभरात हे दोन्ही पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण केले जाणार असून त्यामुळे रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याची काम सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ६०० मेट्रिक टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षक भिंत उभारणीचे आणि रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या ठिकाणी कचरा विल्हेवाटसाठी यंत्रणा बसविण्याचे काम केले जाणार असून या प्रकल्पाचे काम या वर्षांत पूर्ण होईल.

सिमेंट काँक्रीटचे रस्ते

कापूरबावडी ते बाळकुम, क्लेरियंट ते ब्रह्मांड, नंदीबाबा मंदिर ते कोलशेत, वागळे इस्टेट रस्ता क्रमांक २२ आणि ३३ या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून ही कामे या वर्षांत पूर्ण केली जाणार आहेत. घोडबंदर रस्ता ते कावेसर, खारेगाव ते आत्माराम पाटील चौक, कासारवडवली ते बीएसयूपी प्रकल्प इमारत, कळवा-खारेगाव रस्ता, कोलशेत पार्क  ते बाळकुम, मुंब्रा मुख्य रस्ता ते यूटीडब्ल्यूटी, गोल्डन डाईज नाका ते कोपरी पुलापर्यंतचा सेवा रस्ता या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कामे सुरू आहेत. ही कामे या वर्षांत पूर्ण होतील.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ वाहनतळ

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वे प्रशासनाकडून २ हजार दुचाकी उभ्या राहतील, असे प्रशस्त दुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहे. दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत रेल्वे प्रशासनाने तळघर आणि पहिला मजला बांधून पूर्ण केलेला आहे, तर त्यावरील आणखी एक मजल्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे बांधकाम येत्या पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

पारसिक चौपाटी

ठाण्यातील पारसिक-रेतीबंदर चौपाटीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी चार किलोमीटर लांबीच्या खाडीकिनारी भागातील ४२ एकर जागेत सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारणीचे काम सुरू आहे. हे काम यंदाच्या वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. तसेच गायमुख चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम या वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प यंदा मार्गी?

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील रखडलेले प्रकल्प या वर्षांत मार्गी लागण्याची शक्यता आहे.  पाचवी-सहावी मार्गिका, खारेगाव उड्डाणपूल, पत्रीपूल, कात्रप-खरवई रिंगरूट रस्ता यांची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

खाडीकिनारा सुशोभीकरण

ठाणे शहराला ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा लाभलेला असून महापालिकेकडून खाडी सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यात येत आहे. गायमुख, नागलाबंदर, कोलशेत, साकेत, बाळकुम, कोपरी, कळवा, पारसिक या ठिकाणी खाडी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे मे २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

पाचवी-सहावी मार्गिका

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम या वर्षी जून महिन्यात पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान रेल्वेच्या एकूण सहा मार्गिका आहेत. दिवा ते ठाणे या ९ किलोमीटरच्या पट्टय़ात रेल्वेच्या केवळ चार मार्गिका असून त्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण होत होता. तसेच या मार्गिकेमुळे लोकल फेऱ्या वाढवणेही प्रशासनाला शक्य होत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी दोन मार्गिका बांधण्याच्या कामाला दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार होते. वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे काम दहा वर्षे रखडले. अखेर या मार्गिकांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मार्गिकेसाठी मुंब्रा येथे उभारण्यात येणाऱ्या खाडीपुलाचे कामही पूर्ण होत आले आहे. नवीन वर्षांच्या जून महिन्यात हे काम मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा मार्गावर लोकलच्या सुमारे ५० फेऱ्या वाढणार आहेत. तसेच जलद लोकल गाडय़ांची संख्याही या मार्गिकामुळे वाढणार असून लोकलचा वेगही वाढणार आहे.

टाऊन हॉलही नव्या स्वरूपात

ठाण्याच्या कोर्ट नाका या मध्यवर्ती ठिकाणी असलेला ऐतिहासिक टाऊन हॉलही कात टाकणार आहे. सध्या टाऊन हॉलच्या दुरुस्तीचे काम सुरू असून नव्या वर्षांत अद्ययावत स्वरूपात टाऊन हॉल ठाणेकरांसाठी खुले होणार आहे. या हॉलचे नव्याने नूतनीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या खुल्या सभागृहाच्या घुमटाचे काम संजय केळकर यांच्या आमदार निधी आणि जिल्हा नियोजनाद्वारे होत आहे.

विविध उद्याने मार्गी

ठाणे महापालिका क्षेत्रातील जयभवानीनगर, पाचपखाडी, कोपरी, मुल्लाबाग आणि कासारवडवली या भागांतील पाच उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी मिनी ट्रेन बसवण्यात येणार आहेत. ही कामे या वर्षांत पूर्ण केली जाणार आहेत. तसेच गुलाब पुष्प उद्यान, संजीवनी उद्यान, साहसी खेळाचे उद्यान आणि जैवविविधता उद्यान ही कामे सुरू असून तीसुद्धा यंदाच्या वर्षांत पूर्ण केली जाणार आहेत.

खारेगाव उड्डाणपूल

मध्य रेल्वेच्या कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम अखेर या वर्षी पूर्ण होणार आहे. ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी खारेगाव उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी रेल्वेच्या जागेवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. जोडरस्त्यांचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. जोडरस्त्यांची जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे हे काम रखडले होते. कळवा पूर्वेकडील जागा मफतलाल कंपनीची होती. या जागेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेने मफतलाल कंपनीला ३८ कोटी रुपये दिले आहेत, तर पश्चिम बाजूला असलेली खासगी जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. यामुळे दोन्ही बाजूला जोडरस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेने या पुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होणार असून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा पूर्व आणि पश्चिमेची वाहतूक सुरळीत होणार असून मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतुकीत फाटकामुळे होणार अडथळाही दूर होणार आहे.

कल्याण-डोंबिवली ३५ वास्तूंसाठी सौरऊर्जेचा वापर

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन सौरऊर्जेचा वापर यंदाच्या वर्षांत वाढविणार आहे. महापालिकेच्या ३५ वास्तूंसाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.  महापालिकेची रुग्णालये, मुख्य इमारत, क्रीडांगणे, नाटय़गृहे, वॉर्ड कार्यालये आणि शाळा अशा ३५ इमारतींच्या छताची जागा ही ठेकेदाराला सौरऊर्जेची उपकरणे बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत.

पत्रीपूल

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपूल हा सर्वाधिक वर्दळीचा पूल. मुंबईत पूल दुर्घटना घडत असल्याने तो प्रकार पत्रीपुलाबाबत होऊ नये म्हणून रेल्वेने पत्रीपूल एका रात्रीत सर्व प्रकारच्या वाहनांना गेल्या वर्षी बंद केला. हा पूल मार्च २०१९ पर्यंत बांधण्याचे आश्वासन दिले होते; परंतु राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पूल बांधकाम आराखडे मंजूर करण्यावरून रस्सीखेच झाली. या पुलाचे सांगाडे तयार करण्याचे काम हैदराबाद येथे सुरू आहे. रेल्वेने पत्रीपूल येथे पूल उभारणीचे प्राथमिक काम हाती घेतले आहे. या पुलाच्या कामासाठी १२ कोटींचा खर्च येणार आहे. या पुलामुळे वर्षभर प्रवाशांनी अतोनात वाहन कोंडीला तोंड दिले आहे. फेब्रुवारी अखेपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचा  प्रयत्न आहे.

बदलापूर कात्रप-खरवई रिंगरूट रस्ता

बदलापूर शहराच्या पूर्वेला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे काटई, बदलापूर आणि कर्जत महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. बदलापूर पूर्वेतील कात्रप पेट्रोल पंप ते खरवई नाक्यापर्यंत काटई-बदलापूर-कर्जत या महामार्गाने पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. त्यात कर्जतमार्गे पुण्याला जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी वाढते. यावर पर्याय म्हणून एमएमआरडीएने कात्रप ते खरवई या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. कात्रप पेट्रोल पंपापासून ते खरवई ज्युवेलीपर्यंतच्या साडेचार किलोमीटरच्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे खरवई, ज्युवेली, कोंडेश्वर, भोज धरण, शिरगाव, कात्रप या भागांत जाणार वाहतूक थेट या रिंगरूट मार्गाने वळवता येणार आहे. त्यामुळे काटई-कर्जत महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे,. भविष्यात पालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यास त्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.

उल्हास नदीवर नवा पूल

बदलापूर शहर ते बदलापूर गावाला जोडणारा जुना पूल जीर्ण झाल्याने काही वर्षांपूर्वी हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्या पुलाच्या शेजारी नवा पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत या पुलावरूनही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक वाढल्याने पूल अरुंद बनला आहे. त्यामुळे या पुलाच्या शेजारी एमएमआरडीएच्या माध्यमातून नवा पुलाच्या हालचाली गेल्या वर्षांत झाल्या होत्या. त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या पुलाच्या कामाला आरंभ करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा पूल झाल्याने बदलापूर शहरातून बदलापूर गाव, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग, मुरबाड आणि त्यामार्गे अहमदनगरला जाणे सोयीचे होणार आहे.

जैवविविधता उद्यान

बदलापूर गावाजवळ सामाजिक वनीकरण विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जैवविविधता उद्यानाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी बदलापूर गावाजवळच्या निसर्गसंपन्न टेकडीची निवड करण्यात आली होती. दोन वर्षांपासून या उद्यानाच्या भागात विविध प्रकारची उद्याने उभी केली जात आहेत. त्यासाठी आवश्यक झाडांची लागवड केली जात आहे. हा परिसर नैसर्गिकदृष्टय़ा संवेदनशील असल्याने त्याचे निसर्गत्व टिकवण्यासाठी आणि पर्यटकांना त्याचा अनुभव देण्यासाठी विविध ठिकाणी रस्ते, मचाण उभारण्यात आले आहेत. येत्या वर्षांत हे उद्यान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.

कोपर पूल

गेल्या वर्षी जून महिन्यात शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला कोपर पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी तो सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला. या पुलावरील महावितरणच्या उच्चदाब वाहिन्या हटविणे, त्या भुयारी पद्धतीने टाकणे, पुलावरील पृष्ठभागाचे काम करणे ही कामे पालिका आणि रेल्वे यांच्या समन्वयातून होणार आहेत. रेल्वे पुलावरील बांधकाम आराखडे रेल्वेने मंजूर केले आहेत. रेल्वे मार्गाखालून पूर्व, पश्चिम भुयारी वीजवाहिन्या टाकण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी एक कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे. तो खर्च जिल्हा नियोजन विकास समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. पुलावरील रस्ते पृष्ठभागाचे काम करण्यासाठी दोन कोटी ६२ लाख रुपये खर्च येणार आहे. पुलाखालून वाहिन्या टाकणे, पृष्ठभागाचे काम करणे ही कामे मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

डोंबिवली स्थानकात पादचारी पूल

डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण बाजूकडील पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळे तोडण्यात आला. पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा हा पूल तोडल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातील स्कायवरून किंवा ठाकुर्ली उड्डाणपूल किंवा गणेश मंदिराजवळील पुलावरून ये-जा करावी लागते. यापूर्वीचा चार मीटरचा असलेला हा पादचारी पूल आता आठ मीटरचा करण्यात येणार आहे. पुलाचे जुने सांगाडे तोडून नवीन पूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. या कामासाठी दोन कोटी खर्च आहे.

वाहतूक दर्शक

कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये वाहतूक दर्शक बसवण्याचा निर्णय पालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. वाहतूक पोलीस आणि पालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे दर्शक (सिग्नल) बसवण्यात येणार आहेत. लालचौकी, दुर्गाडी चौक, सहजानंद चौक, खडकपाडा चौक, पौर्णिमा सिनेमा, सुभाष चौक, शिळफाटा सुयोग चौक, आधारवाडी चौक येथे हे दर्शक बसविण्यात येणार आहेत. जानेवारीमध्ये ही कामे सुरू करून पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

दुर्गाडी पूल

भिवंडी-शिळफाटा रस्त्यावरील दुर्गाडी नवीन पुलाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. मार्च २०१८ मध्ये पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. एमएमआरडीएने या कामासाठी पुन्हा या वर्षी नवीन ठेकेदार नेमला. हे काम आता वेगाने सुरू आहे. कल्याण-भिवंडी रस्त्यावरील या सहापदरी पुलापैकी तिसरी मार्गिका मे २०२० पर्यंत खुली करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानंतर उर्वरित कामे सुरू ठेवून डिसेंबर २०२० पर्यंत पुलाच्या सहा मार्गिका खुल्या करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. या कामासाठी सुरुवातीला ११० कोटी खर्च निश्चित होता. त्यामधील ४० कोटी यापूर्वीच्या ठेकेदाराने खर्च केले होते. त्यामुळे प्राधिकरणाने पुन्हा ६० कोटींची निविदा काढून नवीन ठेकेदार नियुक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 5:24 am

Web Title: stalled projects in thane district will complete zws 70
Next Stories
1 नव्या वर्षांत ठाणेकरांच्या दारी ताजी भाजी
2 रेल्वे रखडपट्टीचा राग तिकीट तपासनीसांवर
3 वसई किल्लय़ातील गैरप्रकारांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
Just Now!
X