महागाईच्या काळात बाजारात स्वस्त आणि मस्त पर्याय  

गणेशोत्सवात आरतीनंतर वाटल्या जाणाऱ्या प्रसादात पूर्वी हटकून दिसणारे साखर-खोबरे आता मिठाईच्या दुकानांमधून बर्फीच्या रूपात ड्रायफ्रूट आणि माव्याच्या नैवेद्याला स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून उपलब्ध होऊ लागले आहे.

वाढत्या महागाईमुळे ड्राटफ्रूटची मिठाई सर्वसामान्य नागरिकांना परवडेनाशी झाली आहे. माव्याच्या मिठाईविषयी त्यातील संभाव्य भेसळीमुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे ‘गडय़ा आपुले साखर-खोबरे बरे’ अशा निर्णयाप्रत भाविक आले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून इतर विविध प्रकारच्या मिठाईंसोबत खोबऱ्याची मिठाई हलवायांच्या दुकानांमध्ये दिसू लागली आहे.

अनेक मराठी कुटुंबांमध्ये अजूनही सणासुदीनिमित्त अशा प्रकारची खोबऱ्याची वडी प्रसादासाठी बनवली जाते. तर काही कुटुंबांमध्ये किसलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये साखर घालून तो प्रसाद म्हणून वाटायची प्रथा अजूनही आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात बऱ्याच ठिकाणी अजूनही हीच पद्धत अवलंबली जाते. मात्र मध्यंतरीच्या काळात मावा आणि ड्रायफ्रूट मोदक मोठय़ा प्रमाणात प्रसाद म्हणून वापरले जाऊ लागले. त्यामुळे खोबऱ्याचा प्रसाद काहीसा मागे पडला. मात्र आता वाढती महागाई आणि शुद्धतेच्या मुद्दय़ामुळे पुन्हा एकदा प्रसाद म्हणून खोबऱ्याची उपयुक्तता लक्षात आली आहे. त्यामुळे आता पूर्वीची घरगुती खोबऱ्याची वडी बर्फीच्या रूपात दुकानात मिळू लागली आहे.

माव्याच्या पदार्थाना उपयुक्त पर्याय

ड्रायफ्रूटच्या तुलनेत खोबरे कितीतरी स्वस्त आहे. पुन्हा ही बर्फी बनविण्यासाठी त्यात मावा टाकण्याचीही आवश्यकता नसते. खोबऱ्यापासून बनविलेली ही मिठाई जवळपास निम्म्या दरात मिळते. ड्रायफ्रूटची मिठाई साधारण आठशे ते बाराशे रुपये किलो दराने मिळते, तर खोबऱ्याची बर्फी  ३५० ते ४०० रुपयांना उपलब्ध आहे.

खोबऱ्यापासून बनविलेली मिठाई उत्तम असली तरी ती नाशवंत असते. ओल्या खोबऱ्यापासून बनविलेली बर्फी फक्त दोन दिवस टिकते. तर, सुक्या खोबऱ्याचा वापर असलेली मिठाई चार दिवस टिकते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून खोबऱ्याच्या बर्फीला ग्राहक पसंती देऊ लागले आहेत.

 -रोहित शहा, टीप-टॉप मिठाई