हवाई तळाजवळ आढळलेला तरुण जम्मू-काश्मीरचा रहिवासी

ठाणे येथील कोलशेत भागातील   हवाईदल तळाच्या उच्च सुरक्षा भिंतीजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील ३५ वर्षीय तरुणाला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासात तो मानसिक रुग्ण असल्याचे दिसून येत असल्यामुळे तो दहशतवादी नसावा, असे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. असे असले तरी सर्व बाजूंनी पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शौकत अहमद कासम खटानन सैद (३५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्य़ातील अच्छाबल तालुक्यामधील शेखपुरा गावचा रहिवाशी आहे. ठाणे येथील कोलशेत भागात हवाईदलाचा हवाई तळ असून हा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. जवानांनी शौकतला पकडून कापुरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. हवाईदलाचे अधिकारी संपतकुमार सेठी यांनी या प्रकरणी तक्रार दिली. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण यांनी तो मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती दिली.

पत्नीच्या शोधात?

हवाई तळाच्या उच्च सुरक्षा भिंतीजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळलेल्या शौकतची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानेही चौकशी केली आहे. त्यानंतर अधिक्षकांनी पोलिसांची पथके पाठवून त्याच्या घराची झडतीही घेतली. परंतु, त्यामध्ये काहीच सापडलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याची पत्नी त्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेली असून तिच्या शोधात तो कोलशेत भागापर्यंत पोहचला असावा, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.